Nobel Peace Prize 2026: भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर; डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा हुलकावणी

Nobel Peace Prize 2026: शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे.
Nobel Peace Prize 2026 Navi Pillay
Nobel Peace Prize 2026 Navi PillayPudhari
Published on: 
Updated on: 

Nobel Peace Prize 2026: २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार भारतीय वंशाच्या नवनेथम नावी पिल्लई यांना जाहीर झाल्याची बातमी समोर आली आहे. शांतता प्रस्थापित करणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे.

नोबेल पुरस्काराच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही घोषणा करण्यात आली आहे. नावी पिल्लई यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कायद्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी काम केले आहे.

Nobel Peace Prize 2026 Navi Pillay
Chemistry Nobel Prize 2026 : 'ऑटोकॅटॅलिसिस' शोधाचा सन्मान: हेन्री कागन आणि केन्सो सोई यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार मिळालेला नाही. ट्रम्प यांनी अनेकदा हा पुरस्कार मिळवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, यंदाही त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरवण्यात आले नाही.

भारताशी काय आहे नवी पिल्लई यांचे नाते?

नावी पिल्लई यांचे वडील नारायणसामी नायडू आणि आई संथामा नायडू होते. त्यांचे कुटुंब मूळचे भारतातील तमिळनाडू राज्यातील होते. नावी पिल्लई यांच्या आजी-आजोबांना १८९० च्या दशकात ऊसाच्या शेतात मजुरी करण्यासाठी भारतातून दक्षिण आफ्रिकेत नेण्यात आले होते.

नावी पिल्लई यांचे वडील नारायणसामी हे बसचालक म्हणून काम करत होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते मासेमारीसारखी इतर कामेही करत असत. अशा सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नावी पिल्लई यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

वर्णभेदाविरोधातील संघर्षातून सुरू झाला प्रवास

नावी पिल्लई यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे झाला. तमिळ भारतीय वंशाच्या कुटुंबात वाढलेल्या पिल्लई यांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा काळ जवळून अनुभवला.

त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि १९६७ मध्ये वकिलीला सुरुवात केली. नटाल प्रांतात स्वतंत्र कायदेविषयक व्यवसाय सुरू करणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या.

वकिली करताना त्यांनी वर्णभेदाविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि कोठडीत ठेवलेल्या व्यक्तींची बाजू मांडली. एखाद्या व्यक्तीला अटक झाली किंवा तिला कोठडीत ठेवले, तरी तिचे मूलभूत अधिकार संपत नाहीत, अशी त्यांची ठाम भूमिका होती.

त्या काळात त्यांचा लढा केवळ कायदेशीर नव्हता. तो समानता, मानवी हक्क आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठीचा संघर्ष होता. भेदभाव करणाऱ्या व्यवस्थेसमोर न झुकता त्यांनी कायद्याच्या माध्यमातून अन्यायाला आव्हान दिले. याच संघर्षाने त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचवले.

रवांडा नरसंहारातील पीडितांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका

नवी पिल्लई यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रवांडा नरसंहाराशी संबंधित खटले. १९९४ मध्ये रवांडामध्ये झालेल्या नरसंहारात लाखो लोकांचा मृत्यू झाला. या काळात अनेक महिलांना लैंगिक हिंसाचारालाही सामोरे जावे लागले. या गंभीर गुन्ह्यांसाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा व्हावी, यासाठी आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली.

१९९५ मध्ये नवी पिल्लई यांची या न्यायाधिकरणावर न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. पुढे १९९९ ते २००३ या काळात त्यांनी न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.

या काळात त्यांनी अशा महत्त्वाच्या खटल्यांमध्ये भूमिका बजावली, ज्यामुळे युद्ध आणि नरसंहाराच्या काळात महिलांवर होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराकडे लक्ष वेधले गेले.

युद्धाच्या काळात महिलांवर होणारा लैंगिक हिंसाचार हा दुर्लक्षित करता येणारा गुन्हा नाही, हे अधोरेखित झाले. पीडितांना न्याय मिळणे आणि गुन्हेगारांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरणे किती महत्त्वाचे आहे, हेही स्पष्ट झाले.

संयुक्त राष्ट्रांतून जगभरातील मानवाधिकारांसाठी आवाज उठवला

आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणातील कामानंतर नवी पिल्लई यांची २००३ मध्ये आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली.

२००८ मध्ये त्यांची संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट २०१४ पर्यंत त्यांनी या पदावर काम केले.

मानवाधिकार उच्चायुक्त म्हणून जगभरातील मानवाधिकारांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणे आणि अधिकारांचे उल्लंघन होत असल्यास ते आंतरराष्ट्रीय समुदायाच्या निदर्शनास आणून देणे, ही त्यांची प्रमुख जबाबदारी होती.

या पदावर कार्यरत असताना त्यांनी विविध देशांतील मानवाधिकारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला. त्यांच्या भूमिकेमुळे अनेकदा सरकारे आणि प्रभावशाली संस्थांशी मतभेदही निर्माण झाले. मात्र, मानवाधिकारांचे संरक्षण आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या प्रश्नांना त्यांनी महत्त्व दिले.

Nobel Peace Prize 2026 Navi Pillay
Anne Carson Nobel Prize in Literature : कॅनडाच्या प्रख्यात लेखिका अ‍ॅन कार्सन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर

महिलांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण काम

नावी पिल्लई यांचे योगदान न्यायालये आणि आंतरराष्ट्रीय संस्थांपुरते मर्यादित राहिले नाही. महिलांचे अधिकार आणि लैंगिक समानतेसाठी काम करणाऱ्या ‘इक्वॅलिटी नाऊ’ या संस्थेच्या सह-संस्थापकांमध्येही त्यांचा समावेश होता.

महिलांवरील भेदभाव दूर करणे, त्यांना समान अधिकार मिळवून देणे आणि त्यांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतले जाणे, या मुद्द्यांवर त्यांनी काम केले.

त्यांचा प्रवास न्यायाच्या व्यापक संकल्पनेची जाणीव करून देतो. युद्ध आणि नरसंहारासारख्या गंभीर गुन्ह्यांबरोबरच समाजातील भेदभाव, अधिकारांपासून वंचित ठेवणे आणि महिलांवरील अन्याय यांविरोधातील लढाही तितकाच महत्त्वाचा आहे.

१० डिसेंबरला ओस्लो येथे पुरस्कार वितरण सोहळा

नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा ९ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली आहे. परंपरेनुसार, नोबेल पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा १० डिसेंबर रोजी नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आयोजित केला जातो. या पुरस्कारासोबत १.२ कोटी स्वीडिश क्रोनर इतकी रक्कम दिली जाते. नावी पिल्लई यांचा कायदेविषयक आणि मानवाधिकार क्षेत्रातील दीर्घ प्रवास समानता, मानवी प्रतिष्ठा आणि न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करतो.

खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित करण्यासाठी अन्यायग्रस्तांना न्याय मिळणे, गुन्हेगारांना त्यांच्या कृत्यांसाठी जबाबदार धरणे आणि प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारांचा आदर राखणे आवश्यक आहे. वंश, लिंग किंवा सामाजिक परिस्थितीच्या आधारावर कोणाच्याही अधिकारांमध्ये भेदभाव केला जाऊ नये, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा संदेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news