

Chemistry Nobel Prize 2026 : रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा आज (दि. ७ ऑक्टोबर) स्टॉकहोममध्ये करण्यात आली. यावर्षी हे पारितोषिक फ्रान्सचे हेन्री बी. कागन आणि जपानचे केन्सो सोई यांना संयुक्तपणे दिले जात आहे. नोबेल समितीच्या मते, 'असिमेट्रिक ऑरगॅनिक सिंथेसिस' (असममित सेंद्रिय संश्लेषण) प्रक्रियेतील 'नॉन-लिनियर इफेक्ट्स' (अरेखीय परिणाम) आणि 'ऑटोकॅटॅलिसिस' (स्व-उत्प्रेरण) यांचा शोध लावल्याबद्दल त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हेन्री कागन यांनी रासायनिक अभिक्रिया नियंत्रित करण्याची एक नवीन पद्धत शोधून काढली. या पद्धतीमुळे पूर्वीच्या पद्धतींच्या तुलनेत रासायनिक अभिक्रियेदरम्यान विशिष्ट "आरशातील प्रतिमेसारखी रचना" ('एनॅन्शिओमर') असलेल्या रेणूंचे अधिक प्रमाणात उत्पादन करणे शक्य झाले आहे. औषधे, स्वाद , सुगंध आणि नवीन पदार्थ तयार करण्यासाठी रासायनिक अभिक्रिया विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांना त्यांच्या या शोधामुळे एक नवी दिशा मिळाली आहे.
केन्सो सोई यांनी विकसित केलेल्या रासायनिक अभिक्रियेमुळे दोन 'आरशातील प्रतिमा' स्वरूपांपैकी केवळ एकाच स्वरूपाचे उत्पादन झाले. नोबेल समितीच्या मते, जैविक प्रणालींशिवाय निसर्गात असे उदाहरण यापूर्वी कधीही आढळले नव्हते. ही अभिक्रिया "सोई अभिक्रिया" म्हणून ओळखली जाते. हा प्रयोग रसायनशास्त्रातील सर्वात उल्लेखनीय प्रयोगांपैकी एक मानला जातो.
हेन्री कागन हे फ्रान्सचे आहेत आणि केन्सो सोई जपानचे आहेत. 'असिमेट्रिक ऑरगॅनिक सिंथेसिस' समजून घेण्यात आणि नियंत्रित करण्यात या दोघांच्याही शोधांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नोबेल पारितोषिकांच्या घोषणेची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी वैद्यकशास्त्रातील (Medicine) पुरस्काराने झाली. त्यानंतर ६ ऑक्टोबर रोजी भौतिकशास्त्रातील (Physics) नोबेल पारितोषिकाची घोषणा करण्यात आली. आता रसायनशास्त्रातील पारितोषिकाची घोषणा करण्यात आली आहे.