

Miss Finland Controversy
हेलसिंकी : माजी 'मिस फिनलंड' साराह जाफ्से हिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे फिनलंडमध्ये मोठे राजकीय वादळ उठले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांना चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांची जाहीर माफी मागावी लागली आहे. जाफ्सेच्या एका कृत्यामुळे फिनलंडमधील वर्णद्वेषाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.
साराह जाफ्से हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. आपली बोटे डोळ्यांच्या कडांवर ठेवून डोळे बारीक करण्याचा प्रयत्न करताना ती या फोटोमध्ये दिसत होती. या फोटोसोबत तिने 'एका चिनी व्यक्तीसोबत जेवण करताना' असे कॅप्शनही दिले होते. काही देशांतील नागरिकांची थट्टा उडवण्यासाठी केलेली अशी कृतीही 'वर्णद्वेषी' मानली जाते.
हे छायाचित्र व्हायरल होताच आशियाई समुदायाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. 'मिस फिनलंड' संस्थेने या घटनेची गंभीर दखल घेत साराहचे विजेतेपद तातडीने काढून घेतले आहे. जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि फिनलंडची विमान कंपनी 'फिनएअर' यांनीही या २२ वर्षीय तरुणीच्या वागण्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांनी सोमवारी या प्रकरणावर भाष्य करताना साराहचे कृत्य 'मूर्खपणाचे' असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, "हे कृत्य फिनलंडच्या समानतेच्या आणि सर्वसमावेशकतेच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करत नाही. आमचे सरकार वर्णद्वेषाचा मुद्दा गांभीर्याने घेत असून त्याविरुद्ध लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." चीन, जपान आणि दक्षिण कोरियातील फिनलंडच्या दूतावासांनी पंतप्रधानांच्या वतीने अधिकृत माफीनामा प्रसिद्ध केला आहे.
फिनलंडच्या 'फिन्स पार्टी'च्या दोन उजव्या विचारसरणीच्या खासदार जुहो ईरोला आणि कैसा गारेडेव यांनी साराहच्या समर्थनार्थ तसेच हावभाव करणारे फोटो पोस्ट केले. यामुळे आगीत तेल ओतले गेले. पंतप्रधान ओर्पो यांनी या खासदारांच्या कृतीवरही ताशेरे ओढले आहेत. आता या खासदारांवर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
फिनएअर विमान कंपनीने स्पष्ट केले की, या वादामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून काही स्तरांवरून फिनलंडवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे. जपानमधील एका दैनिकाच्या मते, फिनलंडमधील वर्णद्वेषाची चौकशी करण्यासाठी एका याचिकेवर ७,००० हून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
वाढता विरोध पाहून साराहने इन्स्टाग्रामवर माफी मागितली आहे. तिने दावा केला की, जेवताना डोकेदुखीमुळे तिने तसे हावभाव केले होते आणि तिच्या संमतीशिवाय मित्राने ते कॅप्शन टाकले होते. मात्र, तिची ही माफी फिनलंडच्या स्थानिक भाषेत असल्याने चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या नागरिकांनी ती 'दिखाऊ' असल्याचे म्हणत फेटाळून लावली आहे.