

केवळ एक 'ईमेल' न पाहिल्याच्या निष्काळजीपणामुळे हार्वर्डमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्न राहिले अधुरे
हार्वर्डचे दरवाजे बंद झाल्याचा समज करुन पुढील वाटचालीसाठी टाकले पाऊल
आयुष्यात नवनवीन वाटा खुल्या होत असल्याचा दिला संदेश
Viral Story : Harvard Admission Email Checked After 6 Years
वॉशिंग्टन : "अमेरिकेतील प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्याचे स्वप्न जगभरातील लाखो तरुण पाहतात. येथील प्रवेशासाठी लागणारी जिद्द आणि तीव्र स्पर्धा सर्वश्रुत आहे. मात्र, अशा नामांकित संस्थेत प्रवेश मिळूनही, केवळ एक 'ईमेल' न पाहिल्याच्या निष्काळजीपणामुळे जर ती संधी हातातून निसटली, तर त्याला दुर्दैव म्हणावे की मोठी चूक? असाच काहीसा धक्कादायक प्रकार 'ह्योसांग' नावाच्या तरुणासोबत घडला आहे. विशेष म्हणजे, ज्या हार्वर्डमध्ये जाण्याचे त्याचे स्वप्न होते, त्या प्रवेशाचा ईमेल त्याने तब्बल ६ वर्षांनंतर पाहिला.
ह्योसांगने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेण्याच्या प्रयत्नाची स्टोरी शेअर केली आहे. त्याने म्हटले आहे की, हायस्कूलमध्ये असताना हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून अर्ज केला होता. प्रवेशासाठी सुरुवातीला तो 'वेटिंग लिस्ट'मध्ये होता. आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश व्हावा यासाठी त्याने हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रशासनाला विनंती अर्जही लिहिला होता. यामध्ये त्याने आपलं हार्वर्डमध्ये शिक्षण घेण्याच्या स्वप्नाचाही उल्लेख केला होता; परंतु बराच काळ त्याला विद्यापीठाच्या प्रशासनाकडून उत्तर मिळाले नाही. अखेर हार्वर्डचे दरवाजे आपल्यासाठी बंद झाले आहेत, असा समज करून त्याने आपली पुढील वाटचालीसाठी पाऊल टाकले.
नुकताच ह्योसांग आपला जुना ईमेल इनबॉक्स डिलिट करत असताना त्याला एक जुना मेल दिसला. हा मेल त्याने आजवर ओपनच केला नव्हता. तो ईमेल उघडल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. तो मेल चक्क हार्वर्ड विद्यापीठाचा होता. यामध्ये त्याला प्रवेश मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सहा वर्षांपूर्वीच त्याला प्रवेश मिळाला होता, पण एका तांत्रिक चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे तो ईमेल त्याच्या नजरेतून सुटला होता.
हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला होता; पण मेल चेक न केल्याने येथे शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याने सुरुवातीला स्वतःचा खूप राग आला आणि दुःखही झाले. नंतर ही गोष्ट मजेशीर वाटू लागली," असे ह्योसांगने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
हार्वर्डची संधी हुकली असली तरी ह्योसांगला आज त्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. कारण या ६ वर्षांत त्याने संगीताच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तो एक यशस्वी गायक आणि संगीतकार आहे. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर त्याचे १.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
ह्योसांग म्हटले आहे की, मी हार्वर्ड विद्यापीठाचा ईमेल वेळेत पाहिला असता, तर आज तो कदाचित गायक झालो नसतो. आयुष्यात एखादी संधी निसटली तरी नवनवीन वाटा खुल्या होतात, हेच त्याच्या या अनुभवातून शिकायला मिळते. दक्षिण कोरियापासून अमेरिकेपर्यंतचा त्याचा हा प्रवास सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.