

बांगलादेशचे उच्चायुक्त एम. रियाझ हमीदुल्ला यांना बजावला समन्स
धमकी प्रकरणी व्यक्त केली तीव्र चिंता
सत्तांतरानंतर भारत-बांगलादेश संबंधांमधील तणाव कायम
Bangladesh High Commissioner summoned
नवी दिल्ली : बांगलादेशातील ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयास मिळालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर भारताने आज (दि. १७) बांगलादेशचे उच्चायुक्त एम. रियाझ हमीदुल्ला यांना समन्स बजावले. प्रकार ईशान्येकडील राज्यांना उद्देशून ‘सेव्हन सिस्टर्स’ला वेगळे ठेवण्याची धमकी देणाऱ्या एका नेत्याच्या वक्तव्यानंतर अवघ्या एका दिवसात ही कारवाई करण्यात आली. भारातने एम. रियाझ हमीदुल्ला याच्याकडे या प्रकरणी तीव्र चिंता व्यक्त केली आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांना एकत्रितपणे ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हणून ओळखले जाते. नॅशनल सिटिझन पार्टी (एनसीपी) चा म्होरक्या हसनत अब्दुल्ला याने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. बांगलादेश अस्थिर झाल्यास ईशान्य भारतातील सात राज्ये (सेव्हन सिस्टर्सला) वेगळे पाडण्याची आणि ईशान्येकडील फुटीरतावाद्यांना आश्रय देण्याची धमकी त्याने दिली आहे. आपल्या तीव्र भारतविरोधी वक्तृत्वासाठी ओळखले जाणारा अब्दुल्ला हा विद्यार्थी-नेतृत्वाखालील एनसीपीचे मुख्य संघटक आहे.
भारत आणि बांगलादेशातील मुक्ती योद्ध्यांनी एकत्र लढलेले हे युद्ध ६ डिसेंबर १९७१ रोजी ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांच्या शरणागतीने संपले आणि त्यातून बांगलादेशाची निर्मिती झाली होती. भारतात मंगळवार, १६ डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा करण्यात आला. १९७१ च्या पाकिस्तानविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या ५४व्या वर्धापनदिनानिमित्त हा दिवस साजरा करण्यात आला. दरम्यान, अलीकडेच भारतीय उच्चायोगाला धमकी मिळाल्यानंतर या प्रकरणी भारताने बांगलादेश सरकारकडे औपचारिकरित्या आपली हरकत नोंदवली आहे. ढाक्यातील भारतीय उच्चायोगाच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत भारताने आज बांगलादेशचे उच्चायुक्त एम. रियाज हमीदुल्ला यांच्याकडे तीव्र चिंता व्यक्त केली. सरकारने औपचारिकपणे धमकीचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नसले, तरी हा प्रकार गंभीर सुरक्षाविषयक बाब म्हणून पाहिला जात आहे.
मंगळवारी दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयातही ‘विजय दिना’निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्चायुक्त हमीदुल्ला यांनी भारत-बांगलादेश संबंध परस्पर हिताचे असल्याचे अधोरेखित केले. “भारतासोबतचे आमचे संबंध सामायिक हितसंबंधांवर आधारित आहेत. आमच्यात परस्परावलंबन आहे. प्रादेशिक समृद्धी, शांतता आणि सुरक्षेवर आम्ही पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, गेल्या वर्षी शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकारचा पाडाव झाल्यानंतर नवी दिल्ली आणि ढाका यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.