
Elon Musk Political Party : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क यांच्यातील संघर्ष आता राजकीय आखाड्यात पोहचला आहे. मस्क यांनी शनिवारी (दि. ५ जुलै) 'अमेरिकन पार्टी' ची स्थापना केली आहे. अमेरिकन नागरिकांना त्यांचे स्वातंत्र्य परत मिळवून देण्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, "देशाचे नुकसान करणारी अनावश्यक आणि खर्चिक धोरणे तयार केली जातात, तेव्हा आपण प्रत्यक्षात लोकशाहीत नाही तर एका पक्षीय व्यवस्थेत जगत असतो. अमेरिकेत नागरिकांसमोर खरे राजकीय पर्याय शिल्लक राहिलेले नाहीत, असा दावाही त्यांनी केला. याच कारणामुळे आपण आपला राजकीय पक्ष, म्हणजेच 'अमेरिकन पार्टी'ची स्थापना करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मस्क यांनी काही दिवसांपूर्वी 'एक्स'वर एक सर्वेक्षण (पोल) घेतले होते. "आपण नवीन राजकीय पक्षाची स्थापना करावी का?" असा प्रश्न त्यांनी विचारला होता. या सर्वेक्षणात ६५ टक्के लोकांनी पक्षाच्या स्थापनेला पाठिंबा दर्शवला. यानंतर मस्क यांनी म्हटले की, "तुम्ही मोठ्या फरकाने नवीन पक्षाची मागणी केली आहे आणि आता तो तुम्हाला मिळत आहे." आपल्या पक्षाचा उद्देश अमेरिकन नागरिकांना त्यांचे गमावलेले स्वातंत्र्य परत मिळवून देणे हा आहे, असे मस्क यांचे म्हणणे आहे.
मस्क आणि ट्रम्प यांच्यातील वादाचे मूळ कारण अमेरिकेचे नवीन 'बिग ब्युटीफुल बिल' आहे. हे विधेयक अमेरिकन काँग्रेसने ४ जुलै रोजी मंजूर केले होते. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसबाहेर खास पद्धतीने त्याचा आनंदही साजरा केला होता. मात्र, हे विधेयक देशाच्या तिजोरीवरील भार वाढवेल आणि अमेरिकेला कर्जाच्या खाईत लोटेल, असा दावा मस्क यांनी केला आहे.
मस्क यांनी केवळ ट्रम्पच नव्हे, तर या विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांवरही टीकास्त्र सोडले आहे. या विधेयकाच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या सर्व नेत्यांना आपण विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी, या विधेयकाला उघडपणे विरोध करणारे प्रतिनिधी थॉमस मॅसी यांना पाठिंबा देण्याची घोषणाही त्यांनी केली.
मस्क यांच्या या घोषणेमुळे अमेरिकेच्या राजकारणात मोठी घटना ठरली आहे. ट्रम्प आणि त्यांचे समर्थक मस्क यांच्या या पावलाला आपल्या प्रतिष्ठेवरील हल्ला मानत आहेत, तर देशातील तरुणाई मस्क यांच्याकडे एक नवा पर्याय म्हणून पाहत आहेत. आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मस्क यांचा नवीन पक्ष किती गंभीर आव्हान उभे करतो, की केवळ सोशल मीडियावरील चर्चेपुरताच मर्यादित राहतो, हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे.