

"अमेरिकेच्या संसदेमधील हे एक खर्चाने भरलेले, हास्यास्पद आणि लज्जास्पद विधेयक आहे. माफ करा, पण मी आता ते सहन करू शकत नाही," अशा शब्दांमध्ये जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलन मस्क (Elon Musk) यांनी अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने सादर केलेल्या नवीन कर विधेयकावर हल्लाबोल केला.
मस्क यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सरकारने सादर केलेले नवीन कर विधेयक हे खर्चाने भरलेले आणि हास्यास्पद आहे. ज्या मतदारांनी विद्यमान सरकारच्या बाजूने मतदान केले त्यांना आता स्वतःची लाज वाटली पाहिजे. कारण त्यांना माहित आहे की त्यांनी चूक केली आहे. हे विधेयक 'घृणास्पद' आहे. त्यामुळे वित्तीय तूट वाढलीआहे. माफ करा, पण मी आता ते सहन करू शकत नाही...."
मस्क यांनी इशारा दिला की, ट्रम्प सरकारने सादर केलेल्या नवीन कर विधेयकामुळे अमेरिकेची यापूर्वीच असणारी प्रचंड अर्थसंकल्पीय तूट २.५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढेल. यामुळे देशावरील अस्थिर कर्जाचा भार आणखी वाढेल. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मस्क यांनी अमेरिका सरकारच्या 'सरकारी कार्यक्षमता विभाग' ( डीओजीई ) च्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच नवीन कर विधेयकापासून स्वतःला दूर ठेवले आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी मस्क यांनी केलेल्या टीकेला फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. त्या म्हणाल्या की अध्यक्ष ट्रम्प यांना या विधेयकाबद्दल मस्क काय विचार करतात हे आधीच माहित होते; परंतु आता मस्क यांच्या भूमिकेमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प मत बदलणार नाही. नवीन कर विधेयक अमेरिकेच्या हिताचे असून, राष्ट्राध्यक्ष त्यावर ठाम आहेत. दरम्यान, ट्रम्प यांनी या विधेयकाचे वर्णन त्यांच्या आर्थिक धोरणाचा कणा म्हणून केले आहे, तर मस्क हे अनियंत्रित खर्चाचे प्रतीक मानतात.
मस्क यांनी ट्रम्प यांना २५० दशलक्ष डॉलर्सची मदत दिली होती. २०२४ मध्ये ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेसाठी एलोन मस्क यांनी २५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त देणगी दिली होती. त्यानंतर त्यांनी 'डेफिसिट ऑप्टिमायझेशन अँड गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE)' नावाचा उपक्रमही चालवला; परंतु आता तो बंद करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश सरकारी कचरा उखडून टाकणे हा होता. राजकीय प्रतिक्रिया केंटकीचे रिपब्लिकन खासदार थॉमस मॅसी यांनी एलोन मस्क यांना पाठिंबा दिला आणि ते बरोबर असल्याचे सांगितले. प्रत्युत्तरात मस्क यांनी दोन शब्दांत उत्तर दिले - 'सोपे गणित'.
हाऊस स्पीकर माइक जॉन्सन यांनी मस्क यांच्या टीकेला खूप निराशाजनक म्हटले. त्यांनी सांगितले की, सोमवारी एलन मस्क यांच्याशी २० मिनिटे बोलून हे विधेयक मोठ्या प्रमाणात कर कपात आणि निवडणूक आश्वासनांच्या पूर्ततेकडे पहिले मजबूत पाऊल आहे, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु मस्क हे समजू शकत नाही.