

Eiffel Tower Shuts Hindu Group Controversy: सोमवारी कर्मचाऱ्यांनी काम सोडून काढता पाय घेतल्यानंतर पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवर प्रेक्षकांसाठी बंद करण्यात आला. एका हिंदू समुहाने आयफेल टॉवरला भेट दिली होती. त्यावेळी एका वर्कस्टेशनवर काम करणाऱ्या महिलेला तिथून बाजूला हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला. तो हिंदू ग्रुप बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) या संस्थेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे.
आयफेल टॉवर ऑपरेटर SETE यांनी सांगितलं की आयफेल टॉवर हा काही अपरिहार्य कारणांमुळे बंद करण्यात येत आहे. ज्यावेळी बीएपीएसशी निगडीत १०० लोकांनी आयफेल टॉवरला भेट दिली होती. त्यानंतर हे आंदोलन सुरू झालं आहे. ते फ्रान्समधील नवीन मंदिराच्या उद्घाटनासाठी आले होते.
कर्मचारी युनियनचे प्रतिनिधी डाव्होईन यांनी फ्रान्सच्या टीव्हीला मुलाखत देताना म्हटलं की, ज्यावेळी शनिवारी हा हिंदू ग्रुप जात होता त्यावेळी एका महिलेला तिच्या कामाच्या ठिकाणावरून बाजूला जाण्यास सांगण्यात आलं. तिला स्त्री असल्यामुळं साईडलाईन करण्यात आलं, तिला नाहीसं करण्यात आलं असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, SETE यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, हिंदू डेलिगेशनने ज्यावेळी ते आयफेल टॉवरला भेट देतील त्यावेळी त्यांचे महिलांसोबत मर्यादित संभाषण व्हावे अशी विनंती केली होती. मात्र अशी विनंती मान्य केली जाऊ नये.'
सोमवारी बीएपीएस हिंदू मंदिर कडून एक वक्तव्य प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यात पॅरिसमधील घटना त्यांनी गांभिऱ्याने घेतली आहे. त्यामुळं कोणाला वेदना किंवा त्रास झाला असेल तर आम्ही माफी मागतो असं म्हटलं आहे.
ते आपल्या वक्तव्यात पुढे म्हणतात 'आमच्या शिष्टमंडळाचा आकार मोठा असल्यामुळे, इतर पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून हा दौरा सामान्य वेळा सुरू होण्याच्या वेळीच आयफेल टॉवर टीमच्या सहकार्याने आयोजित केला होता,' असे त्यात म्हटले आहे.
'आमच्या माहितीनुसार, आयफेल टॉवरमध्ये प्रवेश करण्यापासून कोणालाही कधीही रोखले गेले नाही,' असे पुढे सांगण्यात आले, तसेच परस्पर आदर आणि सेवेच्या "सार्वभौमिक मूल्यांवर" आमचा विश्वास असल्याचेही स्पष्ट केले.
पॅरिसचे उपमहापौर इमॅन्युएल ग्रेगोइरे (Emmanuel Gregoire) यांनी 'एक्स' (X) वर पोस्ट करत म्हटले आहे की, 'आयफेल टॉवरच्या कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या संतापाची मला जाणीव आहे" आणि अशा प्रकारच्या अटी मान्य करणे "अस्वीकार्य' आहे.