Spain France Wildfire | फ्रान्स-स्पेनमध्ये वणव्याचा कहर; तीन लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर

Spain France Wildfire |
Spain France Wildfire | फ्रान्स-स्पेनमध्ये वणव्याचा कहर; तीन लाखांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर
Published on
Updated on

पॅरिस/माद्रिद; वृत्तसंस्था : युरोपमधील फ्रान्स आणि स्पेन या दोन देशांमध्ये भीषण वणव्यांनी मोठे संकट निर्माण केले आहे. नियंत्रणाबाहेर गेलेल्या आगींमुळे जवळपास तीन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

फ्रान्समध्ये सुमारे २ लाख २० हजार लोकांना, तर स्पेनमध्ये ७५ हजारांहून अधिक नागरिकांना घरातून बाहेर काढण्यात आले आहे. वाढते तापमान, कोरडे हवामान आणि जोरदार वाऱ्यामुळे वणव्यांचा विस्तार वेगाने होत असल्याचे प्रशासनाने सांगितले.

बोर्दो शहराला धोका

फ्रान्समधील बोर्दोच्या दिशेने वणव्याच्या ज्वाळा सरकत आहेत. फ्रान्सचे गृहमंत्री लॉरेंट नुनेझ यांनी परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. ‘‘आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही आणि ती शहराच्या भागाच्या दिशेने पुढे सरकत आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

स्पेनमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान

स्पेनमध्येही वणव्यांनी मोठे नुकसान केले आहे. पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी अविला प्रांताला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. स्पेनच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वणव्यांपैकी एक असलेल्या आगीत ५० हजार हेक्टरहून अधिक जमीन जळून खाक झाली आहे. पूर्व स्पेनमधील कॅस्टेलॉन प्रांतात लागलेल्या आगीने सुमारे ४,३०० हेक्टर क्षेत्र व्यापले असून, ती सिएरा दे एस्पादान नैसर्गिक उद्यानाच्या दिशेने पसरत आहे.

आपत्कालीन मदतीची घोषणा

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी प्रभावित मध्यवर्ती प्रांतांसाठी नागरी संरक्षण आणीबाणी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. आगीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आणि समुदायांना मदत करण्यासाठी पुनर्वसन निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news