

वॉशिंग्टन : प्लूटो या बटुग्रहाच्या पृष्ठभागावर पूर्वीच्या अंदाजापेक्षा खूप मोठ्या क्षेत्रावर मिथेन वायूच्या बर्फाचे गगनचुंबी डोंगर पसरलेले असू शकतात, असा आश्चर्यकारक खुलासा एका नवीन संशोधनातून झाला आहे. या ग्रहाचा सुमारे 60 टक्के विषुववृत्तीय भाग या बर्फाच्या शिखरांनी व्यापलेला असून, ही रचना शास्त्रज्ञांच्या पूर्वीच्या कल्पनांपेक्षा खूपच विस्तृत आहे.
‘जर्नल ऑफ जिओफिजिकल रिसर्च : प्लॅनेटस्’ या प्रतिष्ठित नियतकालिकात 5 जुलै रोजी प्रकाशित झालेल्या या अभ्यासासाठी नासाच्या ‘न्यू होरायझन्स’ यानाने गोळा केलेल्या डेटाचा वापर करण्यात आला आहे. याच यानाने 14 जुलै 2015 रोजी प्लूटोचे आतापर्यंतचे सर्वात जवळून घेतलेले फोटो पृथ्वीवर पाठवले होते.
‘न्यू होरायझन्स’ यानाने प्लूटोजवळून उड्डाण करताना मिथेन वायूच्या गोठलेल्या बर्फाची ही अवाढव्य शिखरं प्रथम पाहिली होती. यातील प्रत्येक शिखर हे आयफेल टॉवरइतके म्हणजे, सुमारे 300 मीटर (1,000 फूट) उंच आहे. ही शिखरं एकमेकांपासून सुमारे 7 किलोमीटर अंतरावर समांतर रांगांमध्ये पसरलेली आहेत, ज्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा भूप्रदेश तयार होतो. खगोलशास्त्रज्ञ या रचनेला ‘ब्लेडेड टेरेन’ म्हणजेच ‘पात्यांसारखी रचना असलेला भूप्रदेश’ म्हणतात. ही रचना सुरुवातीला प्लूटोच्या प्रसिद्ध हृदय-आकाराच्या ‘टॉम्बा रेगिओ’प्रदेशाच्या पूर्वेला असलेल्या ‘टार्टारस डोर्सा’ या पर्वतीय भागात आढळली होती.
प्लुटोवरील ही रचना पृथ्वीवर अँडीजसारख्या उंच पर्वतीय प्रदेशात आढळणार्या ‘पेनिटेंटेस’ नावाच्या बर्फाच्या रचनेशी मिळतीजुळती आहे. मात्र, दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. पृथ्वीवरील ‘पेनिटेंटेस’ हे पाण्याच्या बर्फापासून बनलेले असतात आणि त्यांची उंची जास्तीत जास्त 9 फूट (3 मीटर) असते. याउलट, प्लूटोवरील शिखरं मिथेनच्या बर्फाची असून, ती प्रचंड उंच आहेत. यासारखी रचना गुरूचा चंद्र ‘युरोपा’ येथेही दिसून आली आहे आणि मंगळावरही ती अस्तित्वात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘न्यू होरायझन्स’ यानाला प्लूटोच्या फक्त एकाच बाजूचे उच्च-रिझोल्यूशन फोटो घेता आले होते. त्यामुळे ही शिखरं फक्त त्याच भागात मर्यादित आहेत, असा सुरुवातीचा अंदाज होता. मात्र, यानाने घेतलेल्या इन्फ्रारेड डेटामधून असे दिसून आले की, प्लूटोच्या दुसर्या बाजूलाही विषुववृत्तीय प्रदेशात मिथेन वायू मोठ्या प्रमाणात आहे. यावरून शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला की, ही बर्फाची शिखरं संपूर्ण विषुववृत्तीय पट्ट्यात पसरलेली असावीत. या अभ्यासाचे मुख्य लेखक आणि जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे (गझङ) पोस्टडॉक्टरल फेलो, ईशान मिश्रा यांनी सांगितले की, ‘दुसर्या बाजूचे फोटो अस्पष्ट असले, तरी आम्ही त्या प्रतिमांमधील अप्रत्यक्ष संकेतांचा वापर करून या बर्फाच्या डोंगरांच्या अस्तित्वाचा निष्कर्ष काढला आहे.’
पदार्थ : मिथेन वायूचा गोठलेला बर्फ
उंची : सुमारे 300 मीटर
(आयफेल टॉवरच्या उंचीइतकी)
स्थान : प्लूटोच्या विषुववृत्तीय प्रदेशातील उंच भाग
साद़ृश्य : पृथ्वीवरील ‘पेनिटेंटेस’ नावाच्या रचनेशी साम्य