

Greece Earthquake
ग्रीसमधील क्रेट बेट परिसर गुरुवारी पहाटे शक्तीशाली भूकंपाच्या धक्क्याने हादरला. येथील भूकंपाची तीव्रता ६.१ रिश्टर स्केल एवढी होती. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसच्या माहितीनुसार, या भूकंपामुळे आता युरोपीय देशात त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे.
गुरुवारी पहाटे ग्रीसच्या क्रेट बेटाजवळ शक्तीशाली भूकंप झाला. याचे हादरे पूर्व भूमध्य समुद्रात जाणवले. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्व्हेच्या (USGS) माहितीनुसार, या भूकंप क्रेटची राजधानी हेरक्लिओनपासून ८२ किलोमीटर (५१ मैल) ईशान्येला समुद्राच्या तळाखाली ६८ किलोमीटर खोल भूगर्भात झाला. यामुळे कोणतीही जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
विशेष म्हणजे, पर्यटनासाठी हे लोकप्रिय ठिकाण ओळखले जाते.
ग्रीसच्या दक्षिण किनाऱ्यावरील कासोस बेटाजवळ एका आठवड्यापूर्वी ६.१ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली होती. त्यानंतर आठवड्यात दुसऱ्यांदा हा भूकंप झाला. या भूकंपाचे हादरे पूर्व भूमध्य समुद्राच्या काही भागांतही जाणवले. पण कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
अलिकडील काही महिन्यांत वाढत्या भूकंपामुळे सुरक्षेबाबत खबरदारीचा उपाय म्हणून सँटोरिनी आणि शेजारील बेटांवरील शाळा तात्पुरत्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
ग्रीस हा युरोपमधील सर्वात भूकंपप्रवण क्षेत्रांपैकी एक आहे. हा भाग भूगर्भीयदृष्ट्या वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे ओळखला जातो. येथे कधीकधी विनाशकारी भूकंपही होतात. जानेवारीच्या अखेरीस ग्रीकच्या आग्नेयेस असलेल्या सँटोरिनी, अमोर्गोस, आयोस आणि अनाफी बेटांवर हजारो भूकंपांच्या धक्क्याची नोंद झाली आहे. हे भूकंप प्रामुख्याने कमी तीव्रतेचे होते.