

Trump Extends Ceasefire: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या लष्करी संघर्षात मोठा निर्णय घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवसांचा सीजफायर जाहीर केला होता आता तो १० दिवसांनी वाढवला असून इराणच्या ऊर्जा ठिकाणांवर ६ एप्रिलपर्यंत हल्ले न करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने मात्र यापूर्वीच अमेरिकेसोबत युद्धबंदीसोबत अधिकृत अशी कोणतीही चर्चा सुरू नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र पडद्यामागून युद्ध थांबवण्याबाबत वाटाघाटी सुरू झाल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडूनच विनंती करण्यात आल्यानंतर ही सीज फायर वाढवण्यात आल्याचं सांगितलं. त्यांनी इराणसोबतच्या वाटाघाटी सकारात्मक दिशेनं पुढं जात आहेत असं देखील सांगितलं.
ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं की ते इराणविरूद्धची कोणतीही कारवाई १० दिवसांसाठी म्हणजे ६ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत पुढे ढकलत आहेत.
ते आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, 'इराण सरकारच्या विनंतीनंतर आम्ही इराणच्या ऊर्जा ठिकाणांवर हल्ले न करण्याचा निर्णय पुढच्या १० दिवसांसाठी वाढवत आहोत. ६ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत आम्ही इराणच्या ऊर्जा ठिकाणांवर हल्ले करणार नाही.'
ते आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात, 'सध्या चर्चा सुरू आहे. फेक न्यूज मीडियाद्वारे परस्पर विरोधी वक्तव्य केली जात आहेत. मात्र या परिस्थितीत देखील चर्चा चांगल्या प्रकारे पुढे सुरू आहे.'
अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी इराण वाटाघाटी करण्यास तयार आहे हे एक चांगलं लक्षण आहे. यापूर्वी अमेरिकेनं इराणला होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टीमेटम दिला होता. जर असं झालं नाही तर अमेरिका इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करणार अशी धमकी दिली होती. ही डेडलाईन अनेकवेळा वाढवण्यात आली आहे.
विटक्रॉफ्ट यांनी अमेरिकेने पाकिस्तानच्या माध्यमातून इराणला १५ पॉईंटचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असं सांगितलं. हाच या युद्धाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो असं विटक्रॉफ्ट यांनी सांगितलं. इराण पडद्यामारून वाटाघाटीला प्रतिसाद देत आहे. त्यांनी काही मागण्या केल्या आहेत, ते सध्या अमेरिकेच्या उत्तराची वाट पाहत आहेत.
इराणच्या तसनीम न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार इराणने अमेरिकेच्या प्रस्तावापेक्षा वेगळ्या मागण्या केल्या आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलने हल्ले थांबवावेत, नुकसान भरपाई द्यावी आणि हार्मुझवरील इराणचा अधिकार मान्य करावा अशा मागण्या इराणने केल्या आहेत.
दुसरीकडं इस्त्रायलमधील विरोधीपक्षनेते याईर लापीड यांनी सध्याचा लष्करी संघर्ष हा इस्त्रायलच्या लष्करी क्षमतेवर खूप ताण निर्माण कररत आहे. त्यांनी सरकारवर देशाला मल्टी फ्रंड युद्धात ढकलल्याचा आरोप केला आहे. मात्र यासाठी पुरेसे प्लॅनिंग आणि रिसोर्स निर्माण करण्यात आलेले नाहीत.
इस्त्रायलच्या लष्करी प्रवक्त्यांनी इस्त्रायलला लेबनॉन फ्रंटवर लष्करी ऑपरेशनची व्याप्ती वाढल्यानं अजून ट्रुप्स लागणार असल्याचं सांगितलं होतं.