

Donald Trump Epstein Files: अमेरिकेच्या न्याय विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जेफ्री एप्स्टिन प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत काही गंभीर मात्र अप्रमाणित आरोप समोर आले आहेत. या कागदपत्रांमध्ये दावा करण्यात आला आहे की काही दशक आधी ट्रम्प यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. मात्र न्याय विभागाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी हे असत्य आणि सनसनाटी पसरवण्यासाठी केलेले आरोप असल्याचे सांगितलं आहे.
मंगळवारी सार्वजनिक करण्यात आलेल्या या एप्स्टिन फाईलमधील कागदपत्रांनुसार एका महिलेने ट्रम्प यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. फाईलमध्ये करण्यात आलेला आरोपाला दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळं याला सत्य मानन्यात येऊ नये असे म्हटले आहे.
न्याय विभागाने असामान्यरित्या सार्वजनिक वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. त्यात २०२० च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी काही आरोप एफबीआयकडे पाठवण्यात आले होते. मात्र त्याला कोणताही विश्वसनीय आधार नव्हता. न्याय विभागानं सांगितलं की, 'हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की हे दावे खोटे अन् तथ्यहीन आहेत. जर याच्यात जरा सुद्धा सत्यता असती तर याचा वापार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध आधीच झाला असता.'
प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांनुसार तपास यंत्रणांकडे देखील ठोस अशी माहिती नव्हती. जी माहिती होती त्यात एक कथित पीडित महिलेने ट्रम्प आणि एप्स्टिन यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याचा दावा होता. या प्रकरणात एका लिमोजीन ड्रायव्हरची साक्ष देखील होती. त्या ड्रायव्हरनं ही आरोप करणारी महिला ट्रम्प आणि एप्स्टिननं तिचं शोषण केल्याचे सांगत असताना ते बोलणे ऐकले होते.
कागदपत्रे एफबीआयने पुढे या प्रकरणावर कारवाई केली की नाही याबाबत कोणतीही माहिती देत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प आणि एप्स्टिनवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेचा पुढे डोक्यात गोळी लागून मृत्यू झाला होता.
अमेरिकेच्या न्याय विभागाने या फाईल्समध्ये कुठंही डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी प्रकरणात संशयित मानले गेले आहेत. त्या प्रकरणाचा अधिकृत तपास झाला आहे याचे संकेत मिळत नाहीत. मात्र एप्स्टिन आणि ट्रम्प यांच्यात २००० च्या दशकात सामाजिक संपर्क होता. मात्र ते कोणत्याही गुन्ह्यात थेट संबंधित नाही असं सांगण्यात आलं आहे.
आतापर्यंत एप्स्टिन फाईल्समधील अनेक दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यात २०२० च्या एका ईमेलचा देखील संदर्भ आला आहे. त्यात ट्रम्प यांनी एप्स्टिन यांच्या खासगी विमानातून अनेकवेळा प्रवास केल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र न्याय विभागानं फक्त कागदपत्रात नाव आले म्हणजे ते आरोपी ठरत नाही. ते आरोप सत्य होत नाहीत असं सांगितलं.
मंगळवारी जवळपास ३० हजार दस्तऐवज प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या कागदपत्रात प्रचंड प्रमाणात माहितीची छाटणी करण्यात आली आहे. पीडितांची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी असं केल्याचा दावा न्याय विभागानं केला आहे. येणाऱ्या आठवड्यात अजून कागदपत्रे प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. न्याय विभागाच्या म्हणण्यानुसार पारदर्शकता म्हणजे प्रत्येक आरोप सत्य मानण्यात यावा असं नाही.