

James Watson dies:
नवी दिल्ली : डीएनएच्या दुहेरी सर्पिल (डबल-हेलिक्स) संरचनेचा शोध लावणाऱ्या महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञांपैकी एक, नोबेल पुरस्कार विजेते जेम्स डी. वॉटसन यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी निधन झाले. न्यू यॉर्कमधील ईस्ट नॉर्थपोर्ट, लॉन्ग आयलंड येथे अखेरचा श्वास घेतला. १९५३ मध्ये डीएनएच्या दुहेरी सर्पिल (डबल-हेलिक्स) संरचनेचा त्यांनी शोध लावला.
अमेरिकन जीवशास्त्रज्ञ असलेल्या वॉटसन यांनी १९५३ मध्ये क्रिक आणि विल्किन्स यांच्या मदतीने डीएनएची रचना दोन धाग्यांची, एकमेकांवर पिळवटलेल्या शिडीप्रमाणे हे जगासमोर आणले. या शोधामुळे आनुवंशिक माहिती कशी साठवली जाते आणि पेशी विभाजित होताना डीएनएची नक्कल कशी करतात, हे स्पष्ट झाले. हा शोध विज्ञानातील सर्वात मोठ्या कामगिरीपैकी एक मानला जातो. या शोधासाठी त्यांना १९६२ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले होते. या शोधाच्या वेळी वॉटसन अवघे २४ वर्षांचे होते.
वॉटसन यांचा वैज्ञानिक वारसा जितका महान आहे, तितकाच तो वादग्रस्तही राहिला आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना त्यांच्या जातीयवादी विधानांमुळे मोठी टीका आणि व्यावसायिक निंदा सहन करावी लागली. २००७ मध्ये त्यांनी आफ्रिकन लोकांच्या बुद्धिमत्तेबद्दल केलेल्या विधानांमुळे जागतिक स्तरावर त्यांच्यावर टीका झाली. त्यानंतर त्यांना कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेतील कुलपती पदावरून निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली.
डीएनएच्या शोधानंतर वॉटसन यांनी मोठे संशोधन केले नसले तरी, त्यांनी प्रभावशाली पुस्तके लिहिली. तसेच, त्यांनी 'मानव जीनोम प्रकल्पा'ला मार्गदर्शन केले आणि अनेक तरुण वैज्ञानिकांना प्रोत्साहन दिले.