

वॉशिंग्टन : टेस्लाच्या शेअरधारकांनी सीईओ एलॉन मस्क यांच्यासाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे वेतन पॅकेज काही अटींसह मंजूर केले आहे. हे पॅकेज एक ट्रिलियन डॉलर (सुमारे 83 लाख कोटी रुपये) इतके आहे. आनंद साजरा करताना मस्क यांनी रोबोसोबत नृत्य करून रोबो आर्मी तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
रोबोबद्दल बोलताना मस्क म्हणाले, ऑप्टिमस हा टेस्लाचा ह्युमनॉईड रोबो आहे, ज्याची घोषणा 2021 मध्ये झाली आणि 2022 मध्ये पहिला प्रोटोटाईप दाखवण्यात आला. याचा उद्देश कारखान्यातील कामे, घरगुती कामे किंवा अशी कामे करणे आहे, जी माणसे करू इच्छित नाहीत. टेस्लाचे लक्ष आता रोबो आणि ऑटोनॉमस कार्सवरच आहे.
वेतन पॅकेज मंजूर झाल्यानंतर मस्क म्हणाले, हा टेस्लाचा नवा अध्याय नाही, तर एक नवे पुस्तक आहे. एलॉन मस्क यांना मिळालेले हे ट्रिलियन डॉलरचे पॅकेज त्यांना 2018 मध्ये मिळालेल्या 56 अब्ज डॉलरच्या पॅकेजपेक्षा सुमारे 16 पट जास्त आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी टेस्लाच्या तिमाही निकालांच्या घोषणेवेळी ऑप्टिमस रोबोच्या मदतीने गरिबी दूर करण्याचा दावा केला होता. मानवी रोबो गरिबी संपवण्यासाठी आणि प्रगत आरोग्यसेवा (अॅडव्हान्स्ड हेल्थकेअर) सर्वांसाठी सहज उपलब्ध करून देण्यात मोठी भूमिका बजावू शकते, असा दावा मस्क यांनी केला आहे.
रोबो आणि ऑटोमेशन माणसांच्या खांद्यावरील कष्टाचे ओझे कमी करतील, जेणेकरून समाज उच्च मूल्याच्या (हाय व्हॅल्यू) कामांवर लक्ष केंद्रित करू शकेल. मस्क म्हणाले की, ऑप्टिमस एक दिवस उत्कृष्ट सर्जन बनू शकतो आणि हा त्यांच्या दीर्घकालीन विचारांचा भाग आहे.