

US visa
वॉशिंग्टन: अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी एक अत्यंत कठोर नियम लागू करण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या व्यक्तींना मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार, कर्करोग किंवा इतर कोणतेही जुनाट आजार असतील, तर त्यांना आता अमेरिकेचा व्हिसा किंवा ग्रीन कार्ड नाकारला जाऊ शकतो.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने जगभरातील दूतावासांना याबाबतचे निर्देश पाठवले आहेत. या निर्णयामुळे कायदेशीर इमिग्रेशन प्रक्रियेत मोठा बदल अपेक्षित आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे मुख्य कारण म्हणजे, जी व्यक्ती भविष्यात अमेरिकेवर संभाव्य पब्लिक चार्ज म्हणजे आर्थिक भार ठरू शकते, तिच्या निकषांचा लक्षणीय विस्तार करणारा हा निर्देश जागतिक स्तरावरच्या अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावास कार्यालयांमध्ये परराष्ट्र विभागाने पाठवला आहे.
व्हिसा अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना देण्यात आल्या आहेत की, अर्जदाराच्या वैद्यकीय स्थितीवर लाखो डॉलर्सचा खर्च अपेक्षित असेल, तर त्यांच्या अर्जाला रेड फ्लॅग दाखवावा. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, श्वसन रोग, कर्करोग, मधुमेह, चयापचय रोग, मज्जासंस्थेचे रोग आणि गंभीर मानसिक आरोग्य समस्या, या रोगांचा यामध्ये समावेश आहे. केवळ आजारच नाही, तर स्थूलता देखील एक घटक मानला जाणार आहे, कारण त्यामुळे दमा, उच्च रक्तदाब यांसारखे महागडे आरोग्य प्रश्न निर्माण होऊ शकतात.
या धोरणाचे थेट उद्दिष्ट हे आहे की, अमेरिकेत येणारी व्यक्ती भविष्यात सरकारच्या मदतीवर अवलंबून राहणार नाही. त्यामुळे, जे लोक त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या वैद्यकीय खर्चाचा भार स्वतः उचलू शकतात, अशा सर्वात श्रीमंत आणि सर्वात निरोगी अर्जदारांनाच आता अमेरिकेचा व्हिसा मिळणे सोपे होणार आहे.
"या नियमांमुळे वैद्यकीय ज्ञान नसलेल्या अधिकाऱ्यांना केवळ संभाव्यताच्या आधारावर अर्ज फेटाळण्याचा अफाट अधिकार मिळणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि सामान्य जुनाट आजार असलेल्यांसाठी कायदेशीर इमिग्रेशनचे दरवाजे मोठ्या प्रमाणात बंद होतील."
हा निर्देश पर्यटक आणि विद्यार्थी व्हिसाला लागू होतो की नाही, हे लगेच स्पष्ट झाले नाही. तांत्रिकदृष्ट्या तो सर्व व्हिसा अर्जदारांना लागू असला तरी, प्रामुख्याने तो अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्य करू इच्छिणाऱ्यांसाठी वापरला जाईल अशी अपेक्षा आहे.