

Crude Oil Price
इस्रायल- इराण यांच्यात तणाव कायम आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील महत्त्वाच्या तीन आण्विक ठिकाणांवर हल्ला केल्याने मध्य पूर्वेतील ( Middle East conflict) संघर्ष तीव्र झाला आहे. परिणामी कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. ब्रेंट क्रूड तेलाचा दर २ टक्के वाढून प्रति बॅरल ७७.२७ डॉलरवर पोहोचला. हा दर जानेवारीनंतरचा उच्चांकी दर आहे.
तेल निर्यातदार देशांची संघटना ओपेकचा सदस्य असलेला इराण तिसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामुद्रधुनीतून जगातील २० टक्के कच्च्या तेलाची निर्यात चालते. येथून तेल निर्यातीत अडथळा निर्माण होणार असल्याच्या भीतीने कच्च्चा तेलाच्या दरात वाढ झाली आहे.
जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्यूचर्स २ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ७७.२७ डॉलर्सवर पोहोचले. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूडचा दर २.५ टक्के वाढून ७५.७१ डॉलरवर गेला. याआधी दोन्ही बेंचमार्क सुमारे ३ टक्के वाढले होते. ब्रेंट ८१.४० डॉलरवर आणि WTI ७८.४० डॉलरवर पोहोचले होते.
इराणच्या प्रेस टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या संसदेने होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यासाठी मंजुरी दिली आहे. इराणने यापूर्वीही अशाच प्रकारचा इशारा दिला होता. पण सामुद्रधुनी बंद केली नव्हती.
युरोन्यूजच्या वृत्तानुसार, जर तणाव वाढला तर इराणकडून कमी आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सामुद्रधुनीतील तेल साठे आणि पाइपलाइनला लक्ष्य केले जाऊ शकते. तसेच ते व्यावसायिक जहाजांवरदेखील हल्ला करू शकतात. त्यांच्याकडून जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी टँकर अथवा किनारी बंदरांवर हल्ला केला जाण्याची शक्यता आहे.
इराणच्या या नाकाबंदीमुळे जगभरातील तेलाच्या किमती वाढू शकतात. संपूर्ण युरोपमध्ये, विशेषतः जे मध्य पूर्वेतील इंधनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत अशा देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच भारतातील पेट्रोल- डिझेलचे दरही (Petrol Diesel Prices) आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरावर अवलंबून आहेत. भारत देशांतर्गत एकूण मागणीच्या ८० टक्के तेल आयात करतो. कच्चे तेल महागल्याने त्याचा परिणाम पेट्रोल-डिझेल आणि एलपीजी दरावर होऊ शकतो. यामुळे देशात महागाई वाढू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशात दररोज ५५ लाख बॅरल कच्च्या तेलाचा वापर केला जातो. यातील १५ लाख ते २० लाख बॅरल तेलाचा होर्मुझ सामुद्रधुनीतून पुरवठा होतो. जर होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली तर इतर मार्गांनी तेल आयात करण्यावर केंद्र सरकारकडून विचार केला जात आहे. पेट्रोलियम मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय होर्मुझ सामुद्रधुनीतील परिस्थितीकडे लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे.