

इस्त्रायल-इराण युद्धाच्या भडक्यात रविवारी (दि. २२ जून) अमेरिकेने उडी घेतली. फोर्डो, नतान्झ आणि इस्फाहान या तीन ठिकाणच्या भूमिगत आण्विक स्थळावर जबरदस्त बॉम्बहल्ले केले. बी २ बॉम्बर लढाउ विमानाव्दारे जीबीयू ५७ हे अतिविनाशकारी बॉम्ब या अणुस्थळांवर टाकण्यात आले. आता या हल्ल्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून एक पोस्ट करत झालेल्या नुकसानीची माहिती दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "उपग्रह छायाचित्रांनुसार, इराणमधील सर्व अणुप्रकल्पांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 'संपूर्ण उद्ध्वस्त' हा शब्द यासाठी अचूक आहे! छायाचित्रात दिसणारी पांढरी रचना खडकात खोलवर रुतलेली आहे, तिचे छप्परही जमिनीच्या पातळीखाली असून ते आगीपासून पूर्णपणे संरक्षित आहे. सर्वात मोठे नुकसान जमिनीच्या खाली खोलवर झाले आहे. हा हल्ला म्हणजे 'लक्ष्याचा अचूक वेध' होता, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
इस्रायलने इराणच्या हवाई संरक्षण प्रणाली आणि क्षेपणास्त्र तळांवर आठवडाभर हल्ला सुरु होते. अखेर रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाला निर्णायक धक्का देण्याच्या उद्देशाने थेट हवाई हल्ल्यांचे आदेश दिले. या हल्ल्यानंतर त्यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत ट्रम्प म्हणाले होते की, "इराणमधील फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन प्रमुख अणुउपक्रमांवर आमचा अत्यंत यशस्वी हल्ला पूर्ण झाला आहे. सर्व विमाने आता इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत. मुख्य लक्ष्य फोर्डो अणुप्रकल्प होता. येथे पूर्ण क्षमतेचा बाँबवर्षाव करण्यात आला. सर्व विमाने सुरक्षितरीत्या मायदेशी परतत आहेत."
दरम्यान, रविवारी सायंकाळी अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या मोहिमेला ‘अत्यंत यशस्वी’ असे म्हटले होते. इराणचा अणुकार्यक्रम पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. या हल्ल्यामुळे त्यांच्या अणुउद्योजकीय क्षमतेचा पायाच उद्ध्वस्त झाला आहे, असा दावा अमेरिकेने केला आहे. इस्रायलसोबत उघडपणे केलेली अमेरिकेची लष्करी कारवाईमुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिकच तीव्र झाला आहे. दरम्यान, अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणच्या संसदेने ट्रेट ऑफ हाेर्मुझ म्हणजेच हाेर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रस्तवाला मंजुरी दिल्याची माहिती इराणच्या सरकारी प्रेस टीव्हीने रविवार, २२ जून राेजी दिली.