

दक्षिण अमेरिकात खंडातील कोलंबियामधील राष्ट्रपती पदाचे उमेदवार मिगेल उरीबे टुर्बे (Miguel Uribe Turbay) यांच्यावर राजधानी बोगोटा येथे निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने त्यांच्यावर अंदाधूंद गाेळीबार केला. ते गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी दिली आहे. ( Colombia election 2025)
कोलंबियामध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. विरोधी पक्ष सेंट्रो डेमोक्रॅटिकोचे राष्ट्रपती पदाच्या उमेदवार मिगेल उरी यांची शनिवारी (७ जून) राजधानी बोगोटा येथे निवडणूक प्रचार सभा झाली. ते समर्थकांना संबोधित करत असताना अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोराने अंदाधूंद गोळीबार केला. उरीबे यांच्या पाठीत आणि डोक्यात गोळी लागल्याचे वृत्त आहे. हल्ल्यानंतर ते बेशुद्ध पडले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत समर्थक आणि पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले.
जीवघेण्या हल्ल्यानंतर मिगेल यांच्या पत्नीने 'एक्स' अकाउंटवर पोस्ट करत समर्थकांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'मी मिगुएल यांची पत्नी मारिया क्लॉडिया टाराझोना आहे. मिगुएल जीवनासाठी संघर्ष करत आहेत. आपण देवाकडे प्रार्थना करूया. मी सर्वांना मिगुएल यांच्या आयुष्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करते. माझा देवावर पूर्ण विश्वास आहे.'
बोगोटाचे महापौर कार्लोस फर्नांडो गॅलन यांनी संशयित बंदूकधारी व्यक्तीला घटनास्थळीच पकडण्यात आल्याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी हल्लेखोराला ताब्यात घेण्यासाठी तात्काळ कारवाई केली. देशाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ यांनी नंतर घोषणा केली की, हल्ल्याचे कट रचणाऱ्यांची आणि हल्लेखोराला मदत करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यांना तीन अब्ज कोलंबियन पेसोचे बक्षीस दिले जाईल.
या जीवघेणा हल्ल्याची तुलना कोलंबियातील गत हिंसक भूतकाळाशी केली जात आहे. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात देशाने लुईस कार्लोस गॅलन आणि कार्लोस पिझारो यांच्यासह अनेक उच्चपदस्थ राजकीय व्यक्तींच्या हत्या झाल्या आहेत. पुन्हा एकदा राजकीय नेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटनेने संपूर्ण कोलंबिया हादरला आहे. राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत म्हटलं आहे की, कोलंबिया पुन्हा कधीही राजकीय हिंसाचार वास्तवाचा भाग होऊ नये. माजी राष्ट्रपती अल्वारो उरीबे यांनी मिगेल उरीबे यांना राष्ट्रीय आशेचे स्थान म्हटले आहे. हल्ल्याची गांभीर्याने चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्री लॉरा साराबिया आणि माजी राष्ट्रपती इवान ड्यूक यांनीही या घटनेवर तीव्र दुःख आणि संताप व्यक्त केला आहे. त्यांनी गोळीबाराला देशावर आणि त्याच्या लोकशाहीवर हल्ला म्हटले. सरकारने २०२६ च्या निवडणुकीपूर्वी सर्व राजकीय उमेदवारांसाठी सुरक्षा उपाययोजना मजबूत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
३९ वर्षीय मिगेल उरीबे टुर्बे हे उजव्या विचारसरणीचा पक्ष सेंट्रो डेमोक्रॅटिकचे अध्यक्ष आणि राजकीय नेते आहेत. त्यांनी कोलंबियाच्या युनिव्हर्सिडॅड डी लॉस अँडीस आणि हार्वर्डच्या केनेडी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांचे वडील उरीबे एक व्यापारी आणि संघटनेचे नेते होते. त्यांची आई डायना उरीबे ९० च्या दशकातील प्रसिद्ध पत्रकार होत्या. प्रसिद्ध ड्रग माफिया पाब्लो एस्कोबार याच्या आदेशावरून एका सशस्त्र गटाने त्यांचे अपहरण केले होते. तथापि, बचाव मोहिमेदरम्यान तिची हत्या झाली होती. उरीबे हे विरोधी डेमोक्रॅटिक सेंटर पार्टीचे एक प्रमुख सदस्य आहेत. माजी राष्ट्रपती अल्वारो उरीबे यांनी या पक्षाची स्थापना केली होती. मात्र हे दोघे एकमेकांशी संबंधित नाहीत. मिगेल उरीबे हे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांच्या डाव्या विचारसरणीच्या सुधारणांचे तीव्र टीकाकार आहेत.