बांगला देशात नागरी उठाव; लष्कराकडे ताबा

पंतप्रधान शेख हसीना भारतमार्गे लंडनकडे आश्रयाला
Bangladesh civil uprising
बांगला देशात आरक्षणाच्या विषयावरून आंदोलन
Published on
Updated on

ढाका : आरक्षणविरोधी आंदोलन व यातून पेटलेल्या वणव्याने अखेर बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या सिंहासनालाच सुरुंग लागला. जनतेच्या उठावाने त्यांची सत्ता उलथवून टाकली. हजारो आंदोलकांनी सोमवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे कूच करताच हादरलेल्या शेख हसीना यांनी तातडीने राजीनामा दिला आणि त्यांनी लष्कराच्या विमानाने बांगला देशातून काढता पाय घेतला. त्या भारतमार्गे लंडनला जाणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, बांगला देश लष्कराने सत्ता ताब्यात घेत जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शेख हसीना देशाबाहेर गेल्याने बांगला देशात लाखो लोकांनी आनंदोत्सव सुरू केला आहे. बांगला देशातील या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताने बांगला देश सीमेवर रेड अलर्ट जारी केला असून सीमा सुरक्षा दलाला अतिसतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Bangladesh civil uprising
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा

मागील दोन महिन्यांपासून बांगला देशात आरक्षणाच्या विषयावरून आंदोलन सुरू होते. बांगला देश मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांना सरकारी नोकर्‍यांत आरक्षण देण्यावरून या आंदोलनाचा भडका उडाला. त्यात 300 हून अधिकजण मरण पावले. आरक्षण देण्याचा निर्णय स्थगित केल्यावर काही दिवस बांगला देश शांत होत असतानाच या हिंसाचार प्रकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत विद्यार्थी संघटना व राजकीय पक्षांनी तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले होते. या नव्या आंदोलनातही 92 जण मरण पावले. सोमवारी लाँग मार्चची घोषणा करण्यात आली. बांगला देशच्या विविध भागांतून लाखो तरुण व नागरिक ढाक्याकडे निघाले असतानाच हजारो आंदोलकांनी थेट पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या गण भवनकडे कूच केले.

परिस्थिती स्फोटक बनल्याने कोणत्याही क्षणी काहीही होण्याची शक्यता दिसल्याने लष्कराने हस्तक्षेप करीत पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संपर्क साधला. या चर्चेत शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडण्याचा निर्णय घेतल्यास लष्कर त्यांना बाहेर जाण्यास मदत करेल, असे सांगण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला व बहिणीसह लष्कराच्या विमानातून देश सोडला.

लष्करप्रमुखांची पत्र परिषद

बांगला देशचे लष्करप्रमुख जनरल वकार उझ झमान यांनी पत्रकार परिषद घेत शेख हसीना यांच्या राजीनाम्याची माहिती देतानाच लष्कराने देशाचा ताबा घेत अंतरिम सरकार स्थापत असल्याचे जाहीर केले. आंदोलकांनी हिंसा टाळावी व शांतता प्रस्थापित करावी, अशी विनंतीही त्यांनी केली. तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, तुम्ही आमच्यासोबत काम करा, त्यातूनच मार्ग निघेल, असेही जनरल झमान म्हणाले. आज झालेल्या बैठकीत विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते, असे सांगत सत्ताधारी अवामी लीगचे कोणीही हजर नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Bangladesh civil uprising
Narendra Modi Austria visit | ४१ वर्षानंतर भारताचे पंतप्रधान प्रथमच ऑस्ट्रिया दौऱ्यावर

गण भवनमध्ये लोक घुसले

एकीकडे पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन शेख हसीना देशाबाहेर रवाना होत असतानाच हजारो तरुण आंदोलक गण भवन या पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसले. तेथे त्यांनी टेबल, खुर्च्या, खाण्या-पिण्याच्या वस्तूंसह दिसेल त्या वस्तू लंपास केल्या. काहीजणांनी पंतप्रधानांच्या शयनगृहात जात बेडवर लोळत आनंदोत्सव साजरा केला. ढाक्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो तरुणांचे जत्थे पंतप्रधानांच्या निवासस्थानी येत होते. ढाक्यातील चौकाचौकांत आनंदोत्सव साजरा केला गेला.

पंतप्रधान मोदींना दिली माहिती

बांगला देशात या मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आणि भारतीय यंत्रणा सतर्क झाली. शेख हसीना बांगला देश सोडण्याच्या तयारीत असतानाच दिल्लीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली व त्यांना ताज्या घडामोडींची माहिती दिली.

शेख हसीना दिल्लीत दाखल

शेख हसीना यांना घेऊन बांगला देश लष्कराचे सी 130 विमान भारतीय हवाई हद्दीत शिरताच भारतीय हवाई दलाच्या विमानांनी या विमानाच्या आसपास राहात संरक्षणाची जबाबदारी घेतली. त्यानंतर बांगला देशचे हे विमान सायंकाळी पाचच्या सुमारास दिल्लीपासून 30 कि.मी. अंतरावर असलेल्या हवाई दलाच्या हिंडोन विमानतळावर उतरले. यानंतर थोड्याच वेळात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी हिंडोन विमानतळावर जाऊन शेख हसीना यांची भेट घेतली. या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील मात्र कळू शकला नाही.

Bangladesh civil uprising
Nepal Prime Minister | नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली सरकारचा रविवारी फैसला

सरन्यायाधीशांच्या घरावर हल्ला

दुपारी मोठ्या घडमोडी सुरू असताना एका जमावाने ढाक्यात सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांच्या काकरेल भागातील निवासस्थानावर हल्ला चढवला. जमावाने त्यांच्या घरातील बहुतेक सार्‍या चीजवस्तू, अगदी कार आणि फर्निचरही लुटून नेले. बांगला देशचे गृहमंत्री असदुझ्झमान खान यांच्या धानमंडी भागातील घराला दुपारी एका जमावाने आग लावली. सायंकाळी सहाच्या सुमारास एका जमावाने पोलिस मुख्यालयावरच हल्ला चढवत तोडफोड व जाळपोळ सुरू केली. यामुळे तेथील पोलिस कर्मचार्‍यांनी पळ काढत जीव वाचवला.

Bangladesh civil uprising
Paris Olympics Swapnil Kusale | ऑलिम्पिकवीर स्वप्निल कुसाळेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले अभिनंदन

बंगबंधू म्युझियमही पेटवून दिले

ढाक्याच्या धानमंडी भागात असलेले बंगबंधू भवन आंदोलकांनी पेटवून दिले. या इमारतीत बंगबंधू म्युझियम आहे. त्यात बांगला देश मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या विविध वस्तू व पत्रे आहेत.

अवामी लीगचे कार्यकर्ते टार्गेट

शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे नेते व कार्यकर्ते आंदोलकांच्या टार्गेटवर असून नरसिंगडी जिल्ह्यातील महाब्दी येथे अवामी लीगच्या सहा कार्यकर्त्यांना जमावाने ठेचून मारल्याची घटना घडली. बांगला देशात इतरत्रही असे प्रकार होत असून अवामी लीगच्या कार्यालयांवर हल्ले केले जात आहेत. अवामी लीगचे बडे नेते भूमिगत झाले असून लोकांच्या रोषापासून वाचण्यासाठी कार्यकर्त्यांची धावाधाव सुरू आहे.

Bangladesh civil uprising
भारत आणि बांगलादेशमध्‍ये एक अद्भुत नाते : पंतप्रधान शेख हसीना

विमानतळ सहा तास बंद

ढाक्यात ठिकठिकाणी लुटालूट, जाळपोळ सुरू झाल्यानंतर जगाशी संपर्काचे एकमेव साधन असलेले ढाक्याचे हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले. सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली तर विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. सहा तासांनंतर विमानतळ पुन्हा सुरू करण्यात आला.

शेख हसीना परतणार नाहीत

शेख हसीना यांंचे पुत्र व राजकीय सल्लागार साजीद वाजेद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, देशासाठी इतके केल्यावरही जर लोक असे वागत असतील तर आपण राजीनामा द्यायला हवा, असे शेख हसीना दोन दिवसांपासून विचार करत होत्या. त्या आता पुन्हा बांगला देशच्या राजकारणात परतणार नाहीत. त्यांना प्रचंड वेदन होत आहेत.

Bangladesh civil uprising
भारतासारखा विश्वासू मित्र असल्याने बांगलादेश खूप नशीबवान : शेख हसीना

संसदेत घुसले आंदोलक

पंतप्रधान निवासस्थानात आंदोलक घुसल्यानंतर काही वेळाने बांगला देशच्या संसद भवनातही आंदोलकांचा एक जमाव घुसला. सुरक्षा रक्षकांना मारहाण करीत त्यांनी संसदेचे सभागृह उघडायला लावले. सभागृहातील सदस्यांच्या आसनांवर बसत, फोटो-व्हिडीओ काढत या आंदोलकांनी घोषणा दिल्या. सुमारे तासभर सभागृहात गोंधळ घालून या जमावाने नंतर बाहेर येत पार्क केलेल्या वाहनांना आगीही लावल्याचे वृत्त आहे.

Bangladesh civil uprising
ऑपरेशन गंगा! ९ बांगलादेशींची युक्रेनमधून सुटका, शेख हसीना यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

रहमान यांच्या पुतळ्यावर हातोडा

बांगला देश मुक्तीचे नेते शेख मुजीबूर रहमान यांचा ढाक्यातील पुतळा आंदोलकांचे केंद्र ठरला. हजारो आंदोलक या चौकात जमले. प्रचंड घोषणाबाजी करीत त्यांनी परिसर दणाणून सोडला. काही आंदोलक मुजीबूर यांच्या भव्य पुतळ्यावर चढले. पुतळ्याच्या खांद्यावर चढून या आंदोलकांनी हातोड्याने मुजीबूर यांच्या डोक्यावर घाव घातले.

भारत सतर्क

भारतासाठी महत्त्वाचा शेजारी असलेल्या बांगला देशातील घडामोडींमुळे भारत सतर्क झाला आहे. शेख हसीना यांना भारतमार्गे सुरक्षित लंडनपर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली तर दुसरीकडे बांगला देशातील स्फोटक परिस्थितीमुळे सीमेवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बांगला देश सीमेची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे असून त्यांनाही संपूर्ण सीमा सील करण्यास सांगण्यात आले आहे.

Bangladesh civil uprising
बांगला देशच्‍या 'आयर्न लेडी' शेख हसीना यांना देश का सोडावा लागला?

शेख हसीना ब्रिटनमध्ये आश्रय घेणार

बांगला देशात स्फोटक स्थिती निर्माण झाल्यावर राजीनामा देत शेख हसीना यांनी सुरक्षित बाहेर जाण्यासाठी लष्कराच्या विमानाचा वापर केला. त्या आधी भारतात दाखल झाल्या. येथून त्या लंडनला रवाना होणार आहेत. त्यांनी ब्रिटनमध्ये आश्रय मागितल्याचे सांगितले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news