बांगला देशच्‍या 'आयर्न लेडी' शेख हसीना यांना देश का सोडावा लागला?

आरक्षणविरोधी हिंसाचाराबरोबरच अन्‍य घटकही ठरले कारणीभूत
sheikh hasina
बांगला देशमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामादिला आहे. त्या देश सोडून भारतात सुरक्षित स्थळी रवाना झाल्या आहेत. X (Twitter)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बांगला देशमधील हिंसाचाराच्या (Bangladesh Protests, bangladesh news) पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना ( sheikh hasina) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Bangladesh PM Sheikh Hasina resigns) दिला आहे. त्या देश सोडून भारतात सुरक्षित स्थळी रवाना झाल्या आहेत. शेख हसीना सोमवारी दुपारी २.३० वाजता बंगाभवन येथून लष्कराच्या हेलिकॉप्टरने रवाना झाल्या. त्यांच्यासोबत त्यांच्या धाकटी बहीण शेख रेहाना होत्या. त्यांना “सुरक्षित स्थळी” नेण्यात आल्याचे वृत्त बांगलादेशमधील माध्‍यमांनी दिले आहे. (sheikh hasina) जाणून घेवूया शेख हसीना यांच्‍या राजकीय प्रवासासह त्‍याना देश सोडावे लागणारे प्रमुख कारणांविषयी ...

sheikh hasina : पाचवेळा भूषवले पंतप्रधानपद

शेख हसीना ( sheikh hasina) यांचा जन्‍म २८ सप्टेंबर १९४७ रोजी झाला. बांगला देशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्‍या त्‍या ज्‍येष्‍ठ कन्‍या. पूर्व बंगालमधील तुंगीपारा येथे त्यांनी विद्यार्थी राजकारणातून राजकारणात प्रवेश केला. यानंतर वडिलांचा पक्ष अवामी लीग या विद्यार्थी संघटनेची सूत्रे त्‍यांनी आपल्‍या हाती घेतली. १९६६ मध्ये ईडन महिला महाविद्यालयात त्‍यांनी विद्यार्थी संघाची निवडणूक लढवली आणि उपाध्यक्ष बनल्या. ढाका विद्यापीठातील विद्यार्थी राजकारणातही त्या सक्रिय होत्या. शेख हसीना यांनी तब्‍बल पाच वेळा बांगला देशचे पंतप्रधानपद भूषवले आहे.अवामी लीग पक्षाच्या प्रमुख शेख हसीना यांना त्यांच्या समर्थकांनी 'आयर्न लेडी' ही पदवी दिली आहे.

शेख हसीना यांच्‍या आई-वडिलांसह 3 भावांची हत्या

शेख हसीना राजकारणात सक्रिय झाल्या होत्या; पण 1975 मध्ये त्‍याचे आयुष्‍य काही क्षणात बदलले. बांगलादेशच्या लष्कराने बंड करून हसीनाच्या कुटुंबाविरुद्ध बंड पुकारले. सशस्त्र सैनिकांनी शेख हसीनाची आई, त्‍यांचे तीन भाऊ आणि वडील शेख मुजीबुर रहमान यांची हत्या केली. त्यावेळी हसिना आपले पती वाजिद मियाँ आणि लहान बहिणी यांच्‍यासोबत युरोपमध्ये वास्‍तव्‍यास होत्‍या. आई-वडिलांच्या हत्येनंतर हसिना काही काळ जर्मनीत राहिल्‍या त्‍यानंतर त्‍या भारतात आल्‍या. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हसीना यांना भारतात आश्रय दिला. हसीना आपल्या बहिणीसोबत दिल्लीत ६ वर्षे वास्‍तव्‍यास होत्‍या. १९८१ मध्‍ये शेख हसीना पुन्हा एकदा मायदेशात परल्‍या आणि राजकारणात सक्रीय झाल्‍या. यानंतर त्‍यांनी पाचवेळा बांगलादेशचे पंतप्रधानपदही भूषवले.

'या' कारणांमुळे शेख हसीना यांना देश सोडावा लागला

  • विरोधी पक्षाविरोधात आक्रमक भूमिका

    शेख हसीना यांच्‍यावर देशातील विरोधी पक्षांचा असंतोष दडपल्‍याचा आरोप आहे. त्‍यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि मतभेद दडपण्याच्या घटना घडल्या आहेत. नुकत्याच आरक्षणाविरोधात झालेल्या निदर्शनांनंतरही त्यांच्या सरकारला परिस्‍थिती हाताळण्‍यात अपयश आले. आंदोलकांविरोधात अतिशय कठोर कारवाई होत असल्‍याने हिंसाचाराचा भडका अधिक उडल्‍याचा दावा विरोधी पक्षाचे नेते करत होते.

  • निवडणूक प्रक्रियेत फेरफार केल्‍याचा आरोप

    शेख हसीना यांच्‍या सरकारने लोकशाही कमकुवत केली, असा आरोप बांगला देशमधील विरोधी पक्ष नेते करत होते. त्‍यांच्‍या कार्यकाळात निवडणूक प्रक्रियेत फेरफार आणि हिंसाचार केल्‍याचाही आरोप झघला. सरकारी यंत्रणांनी संशयावरुन विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले. विरोधी पक्षांच्‍या नेत्यांना विविध गोवण्याचे काम पोलिस आणि इतर सरकारी यंत्रणांनी केले. निष्पक्षतेच्या चिंतेमुळे प्रमुख विरोधी पक्षांनी यावेळीही निवडणुकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे देशात विचित्र परिस्थिती निर्माण झाली. शेख हसीना यांच्‍याविरोधात जनमत तयार होत गेले.

  • मानवी हक्कांचे उल्लंघन

    हसीना यांच्या सरकारच्या काळात मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचे दावा करणारे वृत्त बांगला देशच्‍या माध्‍यमातून समोर येत होते. विरोधी पक्ष नेते अचानक बेपत्ता होणे आणि न्यायबाह्य हत्यांचाही दावा करण्‍यात येत होता. परिणामी पाश्चात्य देशांनी काही सुरक्षा दलांवर निर्बंध लादले आहेत.

  • अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विपरीत परिणाम

    माध्‍यमांच्‍या स्वातंत्र्यावर अंकुश ठेवल्याबद्दल हसीनाच्या प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले आहे. सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांना आणि प्रसार माध्यमांना अनेकदा त्रास, कायदेशीर कारवाई किंवा बंदचा सामना करावा लागला. याचा देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विपरीत परिणाम झाल्‍याचा आरोपही होत होता.

  • आरक्षण आंदोलनानंतर हिंसाचाराचा आगडोंब, अखेर शेख हसीना यांना देश सोडावा लागला

    १९७१ मध्‍ये बांगला देश मुक्‍ती चळवळीमध्‍ये लाखो नागरिक सहभागी झाले. बांगला देशला पाकिस्‍तानपासून स्वातंत्र्य मिळाले. यानंतर १९७२ मध्‍ये तत्कालीन पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी ३० टक्‍के आरक्षण जााहीर केले होते. 2018 मध्ये शेख हसीना सरकारने हे आरक्षण रद्द केले. मात्र उच्च न्यायालयाने त्याची पुन्हा अंमलबजावणी केली.स्वातंत्र्यसैनिकांच्या तिसऱ्या पिढीला लाभ का द्यायचा, असा सवालस्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या विरोधात गेल्या काही विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन सुरु झाले. गुणवत्तेवर आधारित भरतीची मागणी करणारे आंदोलक आक्रमक झाले. बांगलादेशमधील विविध जिल्‍ह्यात या आंदोलनाचा भडका उडाला. जुलैमध्‍ये सुरु झालेल्‍या आरक्षणविरोधी आंदोलनात आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्‍यू झाला आहे. रविवारपासून देशात पुन्‍हा हिंसाचाराचा भडका उडला यामध्‍ये आतापर्यंत सुमारे ९४ जणांचा मृत्‍यू झाला. अखेर परिस्‍थिती सरकारच्‍याही आवाक्‍याबाहेर गेली आणि शेख हसीना यांना बांगला देश सोडावा लागला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news