पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीतील कांबळवाडी गावचा सुपुत्र स्वप्निल कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘ब्राँझ’ पदकाला गवसणी घातली आहे. आज गुरुवारी झालेल्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये (50 m Rifle 3P Men's shooting) भारताचा नेमबाज स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) याने ‘ब्राँझ’ पदक जिंकले. भारताचे पॅरिस ऑलिम्पिकच्या नेमबाजीतील तिसरे पदक आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्निलचे अभिनंदन केले आहे. नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाऊंटवर ट्विट करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
''स्वप्निल कुसळेची अप्रतिम कामगिरी! #ParisOlympics2024 मध्ये पुरुषांच्या 50m रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याची कामगिरी विशेष आहे कारण त्याने उत्तम लवचिकता आणि कौशल्य दाखवले आहे. तसेच या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रत्येक भारतीय आनंदाने भरलेला आहे.''
याआधी नेमबाजीत मनू भाकरने दोन तर सरबज्योत सिंगने एक कांस्यपदक जिंकले आहे.
महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांनी १९५२मध्ये हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले होतं. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. यानंतर आज त्यानंतर आज महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदकावर मोहोर उमटवत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकावला आहे.