

Pakistan Lahore Blast
पाकिस्तानमधील पूर्वेकडील शहर लाहोरमध्ये गुरुवारी सकाळी एकामागून एक असे तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. याबाबतचे वृत्त जिओ टीव्ही आणि रॉयटर्स वृत्तसंस्थेने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने दिले आहे. भारताने बुधवारी मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. या तणावादरम्यानच लाहोर शहरात गुरुवारी सकाळी स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त समोर आले आहे.
पाकिस्तानी सैन्याने हा संपूर्ण परिसर सील केला आहे. या परिसरात सायरनही वाजवण्यात आला आहे. पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी या घटनेची पुष्टी केली आहे. लाहोरमध्ये एकामागून एक अनेक स्फोट झाले आहेत. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, हे स्फोट सुमारे ३५ ते ४० मिनिटे सुरू राहिले.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, वॉल्टन विमानतळाजवळ असलेल्या लाहोरमधील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. येथील लोक घराबाहेर पळत असून धुराचे लोट पसरले असल्याचे काही छायाचित्रे समोर आली आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे स्फोट ५ ते ६ फूट लांबीच्या ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आले असल्याची शक्यता आहे.
पाकिस्तानमधील कराची, लाहोर आणि सियालकोट विमानतळांवरील विमान वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. लाहोर आणि सियालकोट विमानतळावरील वाहतूक गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत बंद राहील, असे पाकिस्तानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय सैन्याने मंगळवारी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर मध्यरात्रीनंतर अकस्मात क्षेपणास्त्र हल्ला चढवला. २५ मिनिटांत दहशतवाद्यांचे ९ तळ या हल्ल्याने उखडून फेकले आणि किमान १०० दहशतवादी जागीच ठार केले. यात कंदहार विमान अपहरणात भारताने सोडून दिलेला खतरनाक मौलाना मसूद अझहर याच्या कुटुंबातील १० जणांचा समावेश आहे.
मंगळवारी मध्यरात्री भारताच्या हवाई दलाने राफेल, सुखोई, मिराज या शस्त्रसज्ज अत्याधुनिक विमानांच्या साहाय्याने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. मध्यरात्री बहावलपूर, मुरिदके, बाग, कोटली, मुझफ्फराबाद यासह ९ ठिकाणी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत हल्ले करण्यात आले.