

Operation Sindoor
इस्लामाबाद : आपल्या कर्माने सध्या पाकिस्तानातील जेलची हवा खात बसलेला पाकचा माजी पंतप्रधान भारताच्या एअर स्ट्राईकवर वाट्टेल तो बरळू लागला आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांसह पाकचे लष्कर आणि सर्वसामान्य जनता भारताच्या दणक्याने हादरलेली असताना एअर स्ट्राईकबाबत बोलताना इम्रानखान म्हणाला, पाकिस्तानकडे भारताच्या कोणत्याही हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची सर्व क्षमता आहे. त्यामुळे भारताने जबाबदारीचे भान ठेवून वागावे.
इम्रानखान म्हणाला, जेव्हा 2019 मध्ये पुलवामा घटनेप्रमाणेच बनावट ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’ घडवले गेले, तेव्हा आम्ही भारताला पूर्ण सहकार्याची तयारी दर्शवली होती, पण भारत कोणताही ठोस पुरावा सादर करू शकला नाही. आता पहलगाम घटनेनंतर पुन्हा तेच घडते आहे. आत्मपरीक्षण किंवा चौकशी करण्याऐवजी मोदी सरकार पुन्हा पाकिस्तानवर आरोप करत आहे. भारतासारख्या 1.5 अब्ज लोकसंख्या आणि अण्वस्त्र सज्ज असलेल्या देशाने जबाबदारीने वागले पाहिजे.
शांती ही आमची प्राथमिकता आहे, पण ती कधीही कमजोरी समजली जाऊ नये. पाकिस्तानकडे भारताच्या कोणत्याही दुस्साहसाला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता आहे, हे 2019 मध्ये माझ्या सरकारने संपूर्ण देशाच्या पाठिंब्याने दाखवून दिले. इमरान खान पुढे असेही म्हणाला की, भारताचे नेतृत्व केवळ या प्रदेशासाठीच नव्हे, तर जागतिक शांततेसाठीही मोठा धोका ठरत आहे. 370 कलम बेकायदेशीर रद्दबातल करून भारताने काश्मिरी जनतेवरील अत्याचार वाढवले असून, त्यामुळे स्वातंत्र्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे.