Operation Sindoor |
इस्लामाबाद : भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी अड्डे बेचिराख केले. थेट आंतरराष्ट्रीय सीमा पार करून भारताने ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी बुधवारी पाकिस्तान जोरदार प्रत्युत्तर देईल, अशी वल्गना केली.
राष्ट्रीय स्तरावरील दूरचित्रवाणी भाषणात शरीफ यांनी पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर थेट हल्ला केल्याचा आरोप भारतावर केला आहे. प्रत्युत्तर अपरिहार्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या निष्पाप शहीदांच्या रक्ताचा बदला घेण्याचा संकल्प केला, अशी पोकळ धमकी शरीफ यांनी दिली आहे. शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी सैन्याने पाच भारतीय लढाऊ विमाने पाडली, असा दावा केला. मात्र भारताने तो नाकारला आहे.
शरीफ म्हणाले, नियंत्रण रेषेवर रात्री झालेल्या चकमकीदरम्यान आम्ही दाखवून दिले की, पाकिस्तान बचावासाठी प्रत्युत्तर देऊ शकतो. पारंपारिक लष्करी चकमकीत पाकिस्तानने विजय मिळवला, असा अजब कांगावा भारताच्या हल्ल्याने धास्तावलेल्या शरीफ यांनी केला आहे. काश्मीरबाबत बोलताना ते म्हणाले, "आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, जम्मू आणि काश्मीर हा एक वादग्रस्त प्रदेश आहे आणि सार्वमत होईपर्यंत तो तसाच राहील."
पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यानंतर कोणताही प्रतिहल्ला करण्याचा विचारसुद्धा करू नये. कारण, दहशतवाद्यांवर कारवाई करणे हा भारताचा अधिकार आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला बजावले आहे. त्यामुळे पाकच्या गोटात खळबळ माजली आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाई करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर अमेरिकेने पाकला सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा मोठा मुखभंग झाला आहे.