climate change : दोन हजार वर्षांपूर्वीचा डेटा सुचवणार हवामान बदलावर उपाय

file photo
file photo

रायगड : 'जुने ते सोने' अशी मराठी भाषेत एक म्हण असून ती यथार्थ असल्याचे भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या बिरबल साहनी जीवाश्मशास्त्र संस्थेमधील (बीएसआयपी) संशोधकांनी भारतातील दोन हजार वर्षे जुना पुरातत्त्व, वनस्पती शास्त्रविषयक आणि समस्थानिक डेटा संशोधनांती उपलब्ध करून देऊन, या प्राचीन डेटा भविष्यातील हवामान बदलाचे संकेत देण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे.

आज या सर्व माहितीचे सांगणकीय प्रणालीमध्ये जतन करणे शक्य झाले आहे. याच संगणकीय प्रणालीचा वापर करून वातावरणाचे मागील काही वर्षांतील संच, त्यावेळी असलेल्या वनस्पती, त्यावेळी मानवाने घेतलेली पिके याचा एक माहितीस्रोत (डेटा) तयार करणे शक्य झाले आहे. याच माहितीचा वापर करून व पूर्वीच्या काळी त्या परिस्थितीमध्य कोणत्या प्रकारची झाडे, पिके वाढत होती याचा अंदाज घेऊन भविष्यात अशाच प्रकारचे वातावरणीय बदल झाले, ऋतुचक्रामध्ये बदल आले तर कोणत्या वनस्पती, पिके तग धरू शकतील याचा अंदाज बांधणे शक्य होईल. त्यामुळे बिरबल सहानी जीवाश्म संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञांनी केलेले हे सांशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण असे आहे.

विशिष्ट वनस्पती एका ठरावीक वातावरणीय संचात (तापमान, पाऊस, आर्द्रता, प्रकाश इ.) वाढत असतात. विशिष्ट पिकांसाठी ठरावीक पद्धतीचे हवामान, जमिनीची आवश्यकता असते. काही हजार वर्षांपासून या पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात होती. वेळोवेळी वातावरणात झालेले बदल, भौगोलिक बदल यामुळे काही काळापूर्वी ही जीवसृष्टी पृथ्वीच्या पोटात गाडली गेली. आज या गाडल्या गेलेल्या वनस्पतींचे नमुने जीवाश्मांच्या रूपात आढळून येतात. जीवाश्मांचा सखोल अभ्यास केल्याने भूतकाळातील हवामान आणि परिसंस्थेबद्दल मूल्यवान माहिती मिळते. वेगवेगळ्या कालखंडात वाढणार्‍या वनस्पतींच्या अवशेषांचे परीक्षण करून वनस्पतींचे प्रकार, वातावरणाची परिस्थिती व झालेले बदल याबाबत अंदाज बांधणे शक्य होते.

बीएसआयपीच्या शास्त्रज्ञांच्या एका नवीन अभ्यासानुसार, गुजरातमधील वडनगर या निमशुष्क प्रदेशात ऐतिहासिक आणि मध्ययुगीन काळात अनुक्रमे सौम्य ते तीव्र मान्सून पर्जन्यवृष्टी झाली होती आणि मध्ययुगानंतर भरड धान्यांवर (भरड धान्य; सी 4 वनस्पती) आधारित एक लवचिक पीक अर्थव्यवस्था निर्माण झाली. हा अभ्यास उन्हाळी पावसाळ्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्या हवामानाशी जुळवून घेण्याची मानवाची क्षमता प्रतिबिंबित करणारा आहे. या अध्ययनामुळे भविष्यातील हवामान बदलाशी जुळवून घेण्याची रणनीती आखण्यात मदत होऊ शकते, या निष्कर्षापर्यंत हे संशोधक पोहोचले आहेत.

भारताच्या संदर्भात उन्हाळी पाऊस म्हणजेच आयएसएमच्या महत्त्वामुळे भूतकाळातील त्याची परिवर्तनशीलता आणि सुरुवातीच्या संस्कृतीवरील त्याचा प्रभाव, पुरातत्त्व संदर्भाने विस्तृतपणे अभ्यासला गेला नाही. ऐतिहासिक स्थळांची, पद्धतशीर उत्खननाची दुर्मीळता आणि उपखंडातील बहुविद्याशाखीय कार्ये, भूतकाळातील हवामानातील विसंगतींचा प्रभाव अस्पष्टपणे दर्शवतात. समुद्रापासून अक्षांश, रेखांश आणि अंतरातील फरकांमुळे भारतीय उन्हाळी पर्जन्याची तीव्रता भारतीय भूभागावर बदलते, असेही स्पष्ट झाले आहे.

शास्त्रज्ञांनी गेल्या दोन हजार वर्षांतील बदलत्या पीक पद्धती, वनस्पती आणि सांस्कृतिक विकास यावरील अभ्यासाने पावसाच्या बदलांबद्दल आणि त्याचे परिणाम याबद्दल ऐतिहासिक माहिती शोधून काढली आहे. हे हवामान बदलाला भूतकाळातील मानवी प्रतिसाद आणि भविष्यातील हवामान बदलाच्या संभाव्य धोरणांचा शोध घेण्यासाठी आधुनिक समाजांसाठी महत्त्वाचे संकेत देणारे ठरणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या बिरबल साहनी जीवाश्मशास्त्र संस्थेमधील (बीएसआयपी) संशोधकांच्या या पथकाने वडनगर पुरातत्त्व स्थळावरील पुरातत्त्व, वनस्पतिशास्त्र आणि समस्थानिक माहितीवर आधारित अनेक पर्यावरणीय बदलांच्या सुमारे 2500 वर्षांचा मानवी व्यवसायाची परंपरा मांडली आहे.

क्वाटरनरी सायन्स अ‍ॅडव्हान्सेसमध्ये प्रकाशित झालेला मल्टीप्रॉक्सी अभ्यास हा भूतकाळातील उत्तर गोलार्ध हवामान घटनांदरम्यान निमशुष्क वायव्य भारतात वंशीय संक्रमण आणि पीक उत्पादनाच्या कालखंडाचा शोध घेतो. या कालखंडाला रोमन उष्ण कालावधी (आरडब्ल्यूपी, 250 बीसीई-400 सीई), मध्ययुगीन उष्ण कालावधी (एमडब्ल्यूपी, 800 सीई-1300 सीई) आणि लहान हिमयुग (एलआयए, 1350 सीई-1850 सीई) असे म्हणतात.

हवामान बिघडत असतानाही अन्न उत्पादन कायम राखले गेले, असे पुरातत्त्व स्थळावरून मिळालेली माहिती सूचित करते. ही माहिती पुरातत्त्वशास्त्रीय साहित्यासोबत वनस्पतिविषयक माहिती एकत्रित करणार्‍या पुरातत्त्व वनस्पतिशास्त्रावर आधारित होती. सूक्ष्म वनस्पती अवशेषांव्यतिरिक्त सूक्ष्म वनस्पती (फायटोलिथ), धान्य आणि कोळशाचे समस्थानिक आणि रेडिओकार्बन डेटिंगचाही अभ्यासात समावेश करण्यात आला आहे.

भारतातील नैऋत्य मोसमी काळातील व्यवहारांनुसार उत्तर-पश्चिम परिघातील स्थानामुळे हा प्रदेश तीव्र हवामान (मान्सून) बदलांना प्रतिसाद देण्यासाठी ओळखला जात असल्याने पुरातत्त्व स्थळांच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची क्षमता आहे. प्राचीन लोकांनी वापरलेल्या वनस्पती या त्यांच्या आवडी, व्यवहार आणि पर्यावरणीय परिस्थितीचा थेट पुरावा देत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

पुरातत्त्व डेटामुळे भविष्यात देशाला होणारे फायदे…

1. दोन हजार वर्षांपूर्वीच्या माहिती स्रोताचे (डेटा) विश्लेषण करून आगामी हवामान बदलाचा अंदाज बांधणे शक्य.
2. संभाव्य वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक बदलाबाबत (क्रॉप पॅटर्न) शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे शक्य.
3. पर्जन्यमानातील घट वा अतिवृष्टी या अनुषंगाने जलसाठ्यांबाबत मार्गदर्शन करता येणार.
4. बदलत्या हवामानाबरोबर मानवास जुळवून घेण्याकरिता आवश्यक शक्य नियोजन.

एकत्रित विश्लेषणामुळे वाढती पर्जन्यवृष्टी आणि कमी मान्सूनच्या (दुष्काळ) कालावधीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन सहस्र वर्षांमध्ये अन्न पिकांचे वैविध्य आणि लवचिक सामाजिक, आर्थिक पद्धतींचे मूल्यांकन करणे शक्य झाले असून याचा जागतिक स्तरावर परिणाम झाला आहे. भूतकाळातील हवामानातील बदल आणि ऐतिहासिक काळातील दुष्काळ यांच्याशी संलग्न अभ्यासांवरील निष्कर्ष हे सूचित करतात की, हे केवळ हवामान बिघडण्यापेक्षा संस्थात्मक घटकांवर आधारित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news