मालदीवच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांनी पुन्‍हा ओकली भारताविराेधात गरळ; म्‍हणे, “भारतीय सैनिक..” | पुढारी

मालदीवच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांनी पुन्‍हा ओकली भारताविराेधात गरळ; म्‍हणे, "भारतीय सैनिक.."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनशी जवळीक साधलेल्‍या मालदीवचे राष्‍ट्राध्‍यक्ष मुइझ्झू यांनी पुन्‍हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. मालदीवमध्‍ये भारतीय सैनिक 10 मे नंतर साध्‍या वेषातही राहण्‍याची परवानगी नाही, असे त्‍यांनी म्‍हटले आहे. भारतीय तांत्रिक कर्मचाऱ्यांची पहिली टीम 10 मार्चपर्यंत मालदीवकडे रवाना होण्‍यापूर्वी मालदीव राष्‍ट्राध्‍यक्षांनी हे विधान केले आहे. तसेच मालदीवने नुकताच चीनसोबत मोफत लष्करी मदत मिळवण्यासाठी करार केला आहे.

एका रिपोर्टनुसार, , बा एटोल आयधाफुशी येथे समुदायाला संबोधित करताना राष्ट्राध्‍यक्ष मुइझ्झू म्हणाले की, “भारतीय सैन्याला आम्‍ही परवानगी नाकारली आहे. मात्र काही लोक सरकारबाबत खोट्या अफवा पसरवत आहेत. आता हे लोक भारतीय र्सैनिक साध्‍या वेषात मालदीवमध्‍येच वास्‍तव्‍य करणार असल्‍याचे सांगत आहेत. मात्र ही अफवाच आहे.

भारतीय सैन्य मालदीवमध्‍ये साध्‍या कपड्यांमध्येही राहणार नाही

’10 मे नंतर एकही भारतीय सैनिक देशात वास्‍तव्‍यासाठी राहणार नाही. लष्करी गणवेशाऐवजी साध्‍या वेषात भारतीय सैनिक राहतील, अशी चर्चा होत आहे मात्र मालदीवमध्‍ये भारतीय सैनिक राहणार नाहीत, असे मालदीवच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांनी म्‍हटले आहे.

2 फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांनी मान्य केले होते की, भारत मार्च ते मे दरम्यान मालदीवमधून आपले सैन्य मागे घेईल. ८ फेब्रुवारी रोजी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले होते की, सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या जागी भारतीय तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. ते मालदीवमध्ये दोन हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान चालवत राहतील.

Back to top button