Sextortion : "बुलाती है मगर जाने का नही..." | पुढारी

Sextortion : "बुलाती है मगर जाने का नही..."

पुढारी ऑनलाईन डेस्क

मेट्रो सिटीमध्ये सर्रास होणारे हनी ट्रॅप, सेक्सटाॅर्शनची (Sextortion) प्रकरणं आता कोल्हापूरपर्यंत पोहोचली आहे. अनेकांना गंडा घातला जात आहे. कोल्हापूरमध्ये हनी ट्रॅपच्या माध्यमातून अनेक बड्या व्यापाऱ्यांना आणि काॅलेजच्या मुलांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. पण, या संघटीत टोळीतील ८ जणांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आज पहाटेच मुसक्या आवळल्या. त्यामुळे सोशल मीडियाच्या जमान्यात तुम्ही हनी ट्रॅपमध्ये अडकण्याची आणि सेक्सटाॅर्शनची शिकार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे “बुलाती है मगर जाने का नही”, अशी भूमिका घेत सावध आणि सतर्क रहा… तर हनी ट्रॅप किंवा सेक्सटाॅर्शन म्हणजे काय… ते सविस्तर पाहू…

सेक्सटाॅर्शन म्हणजे नेमकं काय?

बरेच लोक आता फ्लर्टिंग आणि व्हर्च्युअल सेक्स करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. प्रामुख्याने व्हाॅट्स अॅप काॅलिंगचा महत्वाचा आधार घेतला जातात. पण, बहुतांशी लोक बऱ्याच वेळा ऑनलाईन लोकांशी भेटतात. पण, ते कोणाशी बोलले, हेच त्यांना माहीत नसतं. म्हणजे कसं, तर सांगतो… आरोपी एखाद्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून किंवा इतर तत्सम बनावट सोशल मीडियातून पीडित व्यक्तीशी मैत्री करतात. नंतर क्लोज झाल्यासारखे भासवतात.

पीडित व्यक्तीला व्हाॅट्स अॅप काॅलिंगद्वारे काही दिवस संवाद साधतात. आणि नंतर पीडित व्यक्ती कॅमेऱ्यासमोर आला, तर लैंगिक हावभाव करण्यास प्रवृत्त करतात. पीडितेला जाळ्यात ओढण्यासाठी स्त्रीचा वापर मोठा प्रमाणात होतो किंवा काही स्त्रीया पुरूषांना जाळ्यात ओढण्यासाठी अशाप्रकारचे कृत्य करतात. कदाचित महिलांनाही पैशांच आमिष दाखवून किंवा जीवे मारण्याची धमकी देऊन पीडित व्यक्तीला जाळ्यात ओढण्यासाठी भाग पाडलं जाऊ शकतं.

Sextortion

पीडित व्यक्तीचा कॅमेऱ्यासमोर लैंगिक हावभाव करताना एकदा व्हिडिओ रेकाॅर्ड झाला की, तोच व्हिडिओ किंवा फोटोज पीडित व्यक्तीला शेअर केले जातात. आणि धमकी दिली जाते की, हे अश्लिल व्हिडिओ आणि फोटो तुझ्या मित्रांना किंवा कुटुंबाला शेअर केले जातील. त्यांच्या या धमकीमुळे पीडित व्यक्तीला लाजीरवाणे वाटते किंवा पश्चाताप होतो. यांच्या निशाण्यावर सोशल मीडिया वापरणारे तरूण जास्तीत जास्त असतात. हे प्रकरण इथंपर्यंत जातं की, समाजात आपली बदणामी होणार, या भीतीने आत्महत्या करण्यापर्यंत पीडित व्यक्ती जाते.

सेक्सटाॅर्शनमध्ये (Sextortion) पीडित व्यक्ती ही पुरूष आणि महिलादेखील असते. ब्लॅकमेल करून किंवा लैंगिक कृत्य करून सेक्सटाॅर्शन करण्यास पुरुषाला आणि महिलेला भाग पाडले जाते. आरोपी पीडित व्यक्तीला बदनामीची धमकी देत पैसे उकळतात. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे कुणा एखाद्या अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल बोलताना काळजी घ्यावी. विशेषतः आपली खासगी कृती त्यांच्याशी शेअर करत असाल तर, ही काळजी जास्त घ्यावी.

सेक्सटाॅर्शनचे तुम्ही शिकार झाला तर काय कराल? 

घाबरू नका : जेव्हा तुमच्या पहिल्यांदा लक्षात येईल की, तुम्ही सेक्सटाॅर्शनचे बळी ठरला आहात. तेव्हा अजिबात घाबरून जाऊ नका.

पैसे देऊ नका : सेक्सटाॅर्शन (Sextortion) केसमध्ये आरोपींकडून पैशांची मागणी झाली, तर पैसे देऊ नका. कारण, एकदा पैसे दिल्यानंतर तुमचा लैंगिक कृत्याचा व्हिडिओ किंवा फोटोज आरोपीकडून डिलीट केले याची खात्री नाही. पुन्हा तो व्हिडीओ दाखवून तुमच्याकडून वारंवार पैशाची मागणी केली जाईल.

Sextortion

संवाद साधू नका : आरोपीकडून येणाऱ्या धमक्यांना तुम्ही प्रतिउत्तर देत राहिलात, तर आरोपींना असं वाटू शकतं की, तुमच्या आणखी पैसे मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे तुम्हाला ते वारंवार धमकी देऊन पैसे उकळतील.

पोलिसांशी संपर्क साधा : सेक्सटाॅर्शनचा प्रकार तुमच्या बाबतीत झाला, तर सरळ स्थानिक पोलिसांशी संपर्क साधा. तुमच्या बाबतीत जे घडलं आहे, ते सविस्तर सांगा. विशेषतः आरोपींकडून मिळणारी धमकी आणि तुमच्याकडून वसूल केले जाणारे पैसे, याबद्दल निसंकोचपणे सांगा. समजा, तुमचे वय १८ वर्षांच्या खाली असेल, तर घरातील मोठ्या लोकांशी संवाद साधा आणि घरातल्या लोकांना सोबत घेऊन पोलिसांकडे तक्रार करा.

Sextortion

सेक्सटाॅर्शन केसमध्ये आरोपी कोण असतात? 

या प्रकरणांमध्ये केवळ एखादा आरोपी नसतो. हा खरंतर सामुहिक गुन्हा आहे. त्यामुळे सेक्सटाॅर्शनमध्ये अख्खी टोळी काम करत असते. खूप कमी प्रकरणांमध्ये एक व्यक्ती असा गुन्हा करत असतो. अन्यथा, विशिष्ट टोळ्यांकडून सोशल मीडियाद्वारे लोकांना जाळ्यात ओढले जाते आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. सरळ मार्गाने पैसे कमविण्यापैक्षा सेक्सटाॅर्शन प्रकरणातून सहजपणे पैसे उकळले जाऊ शकतात. कारण, मोठ्या प्रमाणात लोक सोशल मीडियामध्ये आहेत आणि हेच लोक सहजपणे जाळ्यात फसू शकतात.

हे वाचलंत का ?

Back to top button