NASAच्या ‘इंजेन्युईटी हेलिकॉप्टर’ मोहिमेला धक्का! मंगळावर लँडिंगवेळी आदळले

NASAच्या ‘इंजेन्युईटी हेलिकॉप्टर’ मोहिमेला धक्का! मंगळावर लँडिंगवेळी आदळले
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : तीन वर्षांत मंगळावर ७२ ऐतिहासिक उड्डाणे पूर्ण केल्यानंतर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ची इंजेन्युईटी हेलिकॉप्टर मोहीम संपुष्टात आली आहे. एक प्रयोग म्हणून डिझाइन केलेले Ingenuity हे १९ एप्रिल २०२१ रोजी दुसऱ्या जगात उड्डाण करणारे, ऑपरेट केलेले पहिले विमान बनले होते. पण इंजेन्युईटी हेलिकॉप्टरच्या मंगळावर लँडिंगदरम्यान एक रोटर ब्लेड पृष्ठभागावर आदळल्याने त्याचे नुकसान झाले आहे.

नासाच्या म्हणण्यानुसार, कॅलिफोर्नियातील पासाडेना येथील नासाच्या (NASA) जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत आलेल्या प्रतिमा आणि आकडेवारीतून दिसून आले आहे की या महिन्यात अखरेचे उड्डाण केलेल्या हेलिकॉप्टरचे एक अथवा अधिक कार्बन फायबर रोटर ब्लेड लँडिंग दरम्यान खराब झाले होते. मोहीम पथकाने स्पष्ट केले आहे की हे हेलिकॉप्टर आता उड्डाण करण्यास सक्षम नाही. इंजेन्युईटी, ज्याने पर्सवेरन्स रोव्हरचा विश्वासू सहाय्यक म्हणून मंगळावर प्रवास केला होता. तो लाल ग्रह मगंळाच्या पृष्ठभागावर सरळ स्थिरावला आहे आणि NASA च्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेतील मिशन कंट्रोलर्स त्याच्याशी संपर्क ठेवण्यास सक्षम आहेत.

या हेलिकॉप्टरने ३० दिवसांत पाच चाचणी उड्डाणे करण्याची अपेक्षा नासाच्या मोहीम पथकाने केली होती. पाच अपेक्षित उड्डाणे पूर्ण केल्यानंतर इंजेन्युईटीने पर्सव्हरेन्स रोव्हरसाठी हवाई स्काउट म्हणून काम करण्याच्या प्रयोगाच्या भूमिकेतून कामगिरी पार पाडली. हेलिकॉप्टरने प्रतिमा टिपण्यासाठी वैज्ञानिक स्वारस्य असलेल्या क्षेत्रांवर उड्डाण केले आणि मोहीम पथकाला तपशीलवार विश्लेषणासाठी पुढील लक्ष्य निर्धारित करण्यात मदत केली. या हेलिकॉप्टरने १८ जानेवारी रोजी अखेरचे उड्डाण केले होते.

रोव्हर आणि हेलिकॉप्टरने एकत्रितपणे मंगळावरील प्राचीन तलाव आणि नदी डेल्टाचे ठिकाण असलेल्या जेझेरो क्रेटरचा शोध घेण्यासाठी गेली काही वर्षे घालवली. शास्त्रज्ञांना आशा आहे की या मोहिमेतून गोळा झालेले नमुने आगामी मोहिमेद्वारे पृथ्वीवर आणले जातील. ज्याद्वारे लाल रंगाच्या मंगळ ग्रहावर जीवन अस्तित्वात आहे की नाही हे निर्धारित करण्यास मदत होईल.

NASA च्या प्रशासक बिल नेल्सन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "दुसऱ्या ग्रहावरील पहिले हेलिकॉप्टर असलेल्या इंजेन्युईटीचा ऐतिहासिक प्रवास संपला आहे. "त्या उल्लेखनीय हेलिकॉप्टरने आमच्या कल्पनेपेक्षा उंच आणि दूरपर्यंत उड्डाण केले आणि जे अशक्य आहे ते शक्य करण्यासाठी NASA ला मदत केली. Ingenuity सारख्या मोहिमेद्वारे, NASA आपल्या सौरमालेतील भविष्यातील उड्डाणासाठी आणि मंगळावर आणि त्यापलीकडे अधिक हुशार, सुरक्षित मानवी शोधासाठी मार्ग मोकळा करत आहे."

दुसऱ्या ग्रहावर राइट बंधूंचा पहिला क्षण गाठण्याव्यतिरिक्त इंजेन्युईटीने अनेक टप्पे पार केले. याने १४ वेळा पुढे आणि नियोजित वेळेपेक्षा ३३ पट जास्त लांब उड्डाण केले. त्याने २ तासांपेक्षा जास्त वेळ उड्डाण केले.

जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे संचालक लॉरी लेशिन यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, "नासा जेपीएलमध्ये आम्ही जे काही करतो त्याच्या केंद्रस्थानी नावीन्य आहे. "इंजेन्युईटी हे आपण ज्या प्रकारे दररोज जेवढे शक्य आहे त्या सीमा पार करतो याचे एक उदाहरण आहे. या ऐतिहासिक तांत्रिक यशामागील आमच्या पथकाचा मला अविश्वसनीय अभिमान आहे आणि ते पुढे काय शोध लावतील हे पाहण्यास उत्सुक आहे."

पहिले अंतराळ हेलिकॉप्टर म्हणून इंजेन्युईटीची तुलना राइट फ्लायरशी केली जाते. जे १९०३ मध्ये पृथ्वीवर यशस्वीपणे उड्डाण करणारे पहिले हवेपेक्षा जड, शक्तिशाली विमान होते. राइट फ्लायरने उड्डाणाच्या पहिल्या दिवशी वाऱ्याने तुटून पडण्याआधी चार वेळा उड्डाण केले होते, असे लेशिन म्हणाले. हा पराक्रम अजूनही मानवतेच्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक मानला जातो आणि आता Ingenuity अशी कामगिरी केली आहे, ज्याने नवीन क्षमता सिद्ध केल्या आहेत.

नेमकं काय झालं?

मोहिम पथकाला त्याचे अचूक स्थान निश्चित करण्यात मदत करण्यासाठी १८ जानेवारी रोजी इंजेन्युईटीच्या एक लहान सरळ उड्डाणाचे नियोजन होते. ज्याला हॉप म्हणून ओळखले जाते. पण हेलिकॉप्टरला त्याच्या याआधीच्या ७१ व्या उड्डाणावेळी आपत्कालीन लँडिंगचा अनुभव आला. ७२ व्या उड्डाणादरम्यान इंजेन्युईटी हवेत सुमारे ४० फूट (१२ मीटर) उंच गेले. ४.५ सेकंदांपर्यंत ते घिरट्या घालत राहिले आणि ते प्रति सेकंद ३.३ फूट (१ मीटर प्रति सेकंद) वेगाने खाली येऊ लागले.

पण जेव्हा हेलिकॉप्टर मंगळाच्या पृष्ठभागापासून ३ फूट (१ मीटर) वर होते, तेव्हा इंजेन्युईटीशी संपर्क तुटला. त्याने रोव्हरला डेटा पाठवणे थांबवले. दुसऱ्या दिवशी इंजेन्युईटीशी संपर्क पुन्हा सुरु झाला ज्यामुळे मोहिम पथकाला फ्लाइट डेटाचे विश्लेषण करण्यास आणि खराब झालेले रोटर ब्लेड पाहायला मिळाले. कम्युनिकेशन ब्लॅकआउटचे कारण आणि हेलिकॉप्टर खाली आल्याने त्याच्या दिशानिर्देशाचा अजूनही तपास केला जात आहे. लँडिंगदरम्यान ब्लेडपैकी एक पृष्ठभागावर आदळले असण्याची शक्यता आहे, असे नेल्सन म्हणाले.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news