‘नासा’ मंगळावरील नमुने आणणार पृथ्वीवर | पुढारी

‘नासा’ मंगळावरील नमुने आणणार पृथ्वीवर

वॉशिंग्टन पुढारी वृत्तसेवा ः अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने आता मंगळ ग्रहावरील दगड-मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्याची तयारी केली आहे. 2028 मध्ये हे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी एक रॉकेट पाठवणार आहे. एका अंतराळयानाबरोबर हे रॉकेट मंगळाकडे रवाना होईल आणि तेथील नमुने घेऊन पृथ्वीकडे परत येईल. मंगळ आणि पृथ्वीमधील अंतर 4 कोटी मैलांचे आहे. यानिमित्ताने प्रथमच एखादे रॉकेट पृथ्वीऐवजी अन्य एखाद्या ग्रहावरूनही लाँच होईल व ते पृथ्वीकडे येईल.

हे रॉकेट ‘नासा’च्या पर्सिव्हरन्स रोव्हरने मंगळभूमीवरून गोळा केलेल्या नमुन्यांना घेऊन येईल. ‘नासा’ने या प्रक्रियेची नुकतीच माहिती दिली असून त्याबाबतचा एक व्हिडीओही जारी केला आहे. ‘नासा’ आणि युरोपियन स्पेस एजन्सीने एकत्रितपणे हा प्रोजेक्ट तयार केला आहे. ‘नासा’चे हे पाऊल 2030 मध्ये मंगळभूमीवर माणसाला पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षेच्या दिशेने आणखी एक पाऊल ठरू शकते.

‘नासा’ने मंगळावर जाण्यासाठी मार्स एसेंट व्हेईकल बनवले आहे ज्यासाठी 19 कोटी 40 लाख डॉलर्सचा खर्च आला आहे. अतिशय कमी वजनाचे हे लाँचर मंगळभूमीवरून एका लँडरमधून उड्डाण करील आणि मंगळाभोवती फिरत असलेल्या अंतराळयानाशी जोडले जाईल. त्यानंतर हे यान पृथ्वीच्या दिशेने आपल्या दीर्घ प्रवासाला सुरुवात करील.

हेही वाचलतं का?

Back to top button