

पुढारी ऑनलाईन : कॅनडाच्या (Canada) दुर्गम वायव्य प्रदेशातील फोर्ट स्मिथजवळ एका खाण कंपनीतील कामगारांना घेऊन जाणारे छोटे विमान मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार) कोसळले. या दुर्घटनेत ६ जण ठार झाले आहेत. रिओ टिंटो या खाण कंपनीशी संबंधित डायव्हिक हिऱ्याच्या खाणीकडे जात असताना विमान दुर्घटनाग्रस्त झाले.
रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी ८:५० च्या सुमारास फोर्ट स्मिथजवळ उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या विमानाची मालकी असलेल्या नॉर्थवेस्टर्न एअर लीजने म्हटले आहे की त्याच्या ताफ्यात दोन प्रकारची ब्रिटिश एरोस्पेस जेटस्ट्रीम मॉडेल्स आहेत. दोन्हीची क्षमता १९ प्रवाशांची आहे. एका जारी निवेदनानुसार, रिओ टिंटोचे मुख्य कार्यकारी जाकोब स्टॉशॉल्म यांनी सांगितले की, या अपघातामुळे कंपनीला मोठा धक्का बसला आहे.
"आम्ही अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत आणि नेमके काय घडले? याचा शोध घेण्यासाठी आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करू," असेही स्टॉशॉल्म म्हणाले.
कॅनडाच्या सशस्त्र दलाचे सार्वजनिक व्यवहार अधिकारी मॅक्सिम क्लिचे यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, बचाव आणि शोध मोहिमेसाठी तीन रॉयल कॅनेडियन एअर फोर्स स्क्वॉड्रन घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नॉर्थवेस्ट टेरिटरीजचे प्रीमियर आरजे सिम्पसन यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाने सांगितले की, या अपघाताची चौकशी करण्यासाठी तपासकर्त्यांचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
शेजारी असलेल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू आणि ४ जण जखमी झाल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे. (Canada)
हे ही वाचा :