‘Apple’ला पिछाडीवर टाकत ‘Microsoft’ बनली जगातील नंबर १ कंपनी! | पुढारी

'Apple'ला पिछाडीवर टाकत 'Microsoft' बनली जगातील नंबर १ कंपनी!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगातील ख्‍यातनाम टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने ॲपल कंपनीला पिछाडीवर टाकत जगातील नंबर एकची कंपनी होण्‍याचा बहुमान पुन्‍हा प्राप्‍त केला आहे. ११ जानेवारी रोजी या कंपनीचे बाजार भांडवल हे ॲपलपेक्षा अधिक झाले. या दिवशी कंपनीचे शेअर्स १.६ टक्‍क्‍यांनी वाढले. यामुळे कंपनीचे बाजार मूल्‍य तब्‍बल २,८७५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पाेहचले. याचवेळी ॲपलचे शेअरर्स ०.९ टक्‍क्‍यांनी घसरले. त्‍यामुळे कंपनीचे बाजारमुल्‍य २,८७१ ट्रिलियनवर आले. यावर्षी सुरुवातीच्‍या आठ दिवसांपासूनच ॲपलचे शेअर्स घसरण अनुभवत आहेत. ( Microsoft Vs Apple )

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स’मधील कामामुळे मायक्रोसॉप्‍टचा दबदबा

कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स- एआय) आता मायक्रोसॉफ्टसाठी वरदान ठरत असल्‍याचे दिसते आहे. यामुळेच गुंतवणूकदार कंपनीला खूप पसंत करत आहेत. २०२१ नंतर प्रथमच ॲपलच्‍या शेअर्सचे मूल्यांकन मायक्रोसॉफ्टपेक्षा कमी झाले आहे. जानेवारी २०२४ मध्ये गुरुवारपर्यंत ॲपलचे शेअर्स 3.3 टक्क्यांनी घसरले आहेत, तर मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये 1.8 टक्क्यांनी वाढ झाल्‍याचे दिसले.
( Microsoft Vs Apple )

मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होईल

गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टच्या किमती ॲपलच्या तुलनेत 9 टक्क्यांनी वाढल्या होत्या. ॲपलच्या शेअर्समध्ये २०२३ मध्ये ४८ टक्के वाढ झाली होती, यादरम्यान मायक्रोसॉफ्टचे शेअर्स ५७ टक्क्यांनी वाढले होते. ॲपलचे बाजार भांडवल 14 डिसेंबर 2023 रोजी शिखरावर होते. त्यावेळी कंपनीचे बाजार भांडवल 3.081 लाख कोटी डॉलर होते.

‘मनीकंट्रोल’च्या रिपोर्टनुसार, अमेरिकन शेअर बाजारातील तज्ज्ञांच्‍या मते, मायक्रोसॉफ्ट कंपनी ॲपलला मागे टाकेल हे जवळजवळ निश्चित होते, कारण मायक्रोसॉफ्टची वाढ वेगवान हाेत आहे. या कंपनीला जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा मिळत आहे. ॲपलच्या शेअर्स घसरणीपूर्वीच कंपनीचे रेटिंग अनेकवेळा खाली आले होते. ( Microsoft Vs Apple )

Microsoft Vs Apple : मागणीत घट झाल्‍याने ॲपलला संघर्ष

अमेरिकेनंतर  ॲपलसाठी चीन ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. मात्र मागील काही महिन्‍यात चीनमध्ये  ॲपल आयफोनची विक्री कमी होत आहे. २०२४ च्या पहिल्या आठवड्यात ही घसरण 30 टक्क्यांपर्यंत होती. तसेच चिनी कंपन्यांची स्पर्धा आणि चीनमध्ये वाढती अमेरिकाविरोधी भावना यामुळे  ॲपल कंपनीला आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button