पुढारी ऑनलाईन डेस्क : Tsunami Fear : अफगाणिस्तान आणि जपाननंतर पापुआ न्यू गिनी येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. 12 तासांपेक्षा कमी कालावधीत तीन देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने जगभरातील भूवैज्ञानिक चिंतेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये त्सुनामीचा धोका वाढला आहे. रविवारी पापुआ न्यू गिनीच्या दुर्गम न्यू ब्रिटन प्रदेशात 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला, असे युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने सांगितले. त्सुनामीचा इशारा अद्याप देण्यात आलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
तत्पूर्वी, शनिवारी रात्री 10.27 मिनिटांनी जपानच्या होक्काइडो शहरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यूएसजीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या शहरात भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. त्यापूर्वी 20 फेब्रुवारीला जपानमध्ये भूकंप झाला होता. त्याची तीव्रता 5.5 होती. मात्र, या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. यानंतर रविवारी (दि. 26) पहाटे अफगाणिस्तानातील फैजाबादमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS)च्या मते, रविवारी पहाटे 2.15 च्या सुमारास 4.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानातील फैजाबादपासून ईशान्येला 273 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. (tsunami fear due to earthquake)
एएफपीनुसार, रविवारी सकाळी पापुआ न्यू गिनीच्या दुर्गम न्यू ब्रिटन प्रदेशात 6.2 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपानंतर त्सुनामी (tsunami fear) येईल अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. पण युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने त्सुनामीचा कसलाही इशारा देण्यात आलेला नाही, असे सांगत लोकांना आश्वस्त केले. युएसजीएसने म्हटले, भूकंपाची खोली 38 किलोमीटर (23 मैल) होती आणि रविवारी सकाळी विरळ लोकवस्ती असलेल्या पश्चिम न्यू ब्रिटन द्वीपसमूह प्रदेशात त्याची नोंद झाली. भूकंपाच्या केंद्रापासून 80 किमी अंतरावर असलेल्या किंबे शहराजवळील वालिंदी प्लांटेशन रिसॉर्टमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.