Covid 19 : कोरोना पुन्हा येतोय? सिंगापूरमध्ये ५६ हजार रूग्ण आढळले | पुढारी

Covid 19 : कोरोना पुन्हा येतोय? सिंगापूरमध्ये ५६ हजार रूग्ण आढळले

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या (Covid 19) नव्या रूग्णांची सिंगापूरमध्ये उच्चांकी नोंद झाली आहे. सिंगापूरमधील रूग्णसंख्या ५६ हजारांवर गेली आहे. ही आकडेवारी मागील आठवड्यातील आहे. गेल्या आठवड्यात ही संख्या ३२ हजार होती. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने १९ डिसेंबरपासून दररोज कोरोना आकडेवारी जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकांना मास्क घालण्याचे आवाहन

सिंगापूर सरकारने लोकांना गर्दी असलेल्या परिसरात मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. जरी लोक आजारी नसले तरीही त्यांनी मास्क वापरावा, असे सांगितले आहे. विशेषत: वृद्ध लोकांसोबत राहणाऱ्यांना घरातही मास्क घालण्यास सांगितले गेले आहे. दरम्यान, कोरोना रूग्णांसाठी सिंगापूर एक्सपो हॉल क्रमांक १० मध्ये बेड्सची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. क्रॅफोर्ड हॉस्पिटलमध्ये याआधीपासून कोविड रूग्णांवर उपचार केले जात आहेत, असे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले. (Covid 19)

कोरोनाच्या ‘या’ प्रकाराने संक्रमित रूग्ण

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांची संख्या दररोज २२५ ते ३५०० च्या जवळपास आहे. त्याचवेळी संसर्गामुळे आयसीयूमध्ये दाखल झालेले रूग्ण दररोज ४ ते ९ असतात. बहुतेक रूग्ण जेएन १ व्हेरिएंटचे संक्रमित आहेत, जे बीए २.८६ संबंधीत आहेत. हा प्रकार जास्त संक्रमित नसल्याचे आतापर्यंतच्या तपासणीत दिसून आले आहे.

भारतात कोरोना रूग्णसंख्या वाढली

भारतातही कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. मात्र चिंता करण्याची गरज नाही. शुक्रवारी, भारतात कोरोनाची २१२ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यापैकी २०० फक्त केरळचे आहेत. तसेच, संक्रमित झालेल्या रूग्णांमध्ये लक्षणे फार गंभीर नाहीत. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात १७ हजार ६०५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.

हेही वाचा : 

Back to top button