इस्‍त्रायलने झुगारला जागतिक दबाव! पंतप्रधान नेतन्याहू म्‍हणाले, “युद्ध जिंकेपर्यंत…” | पुढारी

इस्‍त्रायलने झुगारला जागतिक दबाव! पंतप्रधान नेतन्याहू म्‍हणाले, "युद्ध जिंकेपर्यंत..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : युद्धविरामासाठी जागतिक दबाव असूनही आम्‍ही हमासच्‍या दहशतवाद्यांविरुद्ध लढा देत राहू. युद्ध जिंकेपर्यंत आम्हाला गाझा पट्टीमध्ये युद्ध सुरू ठेवण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्‍पष्‍ट केल्‍याचे वृत्त ‘एएफपी’ने दिले आहे. गाझामध्‍ये मानवतावादी युद्धविराम आणि सर्व ओलीसांची तात्काळ, बिनशर्त सुटका करण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेने मंगळवारी मंजूर केला होता. यानंतर नेतन्याहू यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

लष्करी सुविधा केंद्राला भेट दिल्‍यानंतर बोलताना नेतन्‍याहू म्‍हणाले की, “युद्धविरामासाठी आमच्‍यावर आंतरराष्ट्रीय दबाव येत आहे. मात्र असा दबाव आम्‍हाला थांबवू शकत नाही. युद्ध जिंकेपर्यंत आमचा लढा सुरुच राहिल. आम्हाला हे मिशन पूर्ण करण्याची गरज आहे.”

Israel-Hamas War : गाझामध्‍ये १८ हजारांहून अधिक नागरिक ठार

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्‍या माहितीनसुसार, गाझामध्ये 18,400 हून अधिक लोक मारले गेले आहेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्‍या सर्वाधिक आहे. शहरातील 24 लाख लोकसंख्‍येपैकी 19 लाख लोक युद्धामुळे विस्थापित झाल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्रांने व्‍यक्‍त केला आहे.

आम्ही चर्चा करण्यास तयार : हमास प्रमुखाचा दावा

गाझा शहरात इस्रायलकडून सुरु असलेले हल्‍ले थांबवण्यासाठी आम्‍ही चर्चा करण्‍यास तयार आहोत, असे हमास प्रमुख इस्माइल हनीयेह यांनी म्‍हटले आहे की, “युद्धविरामासाठी पुढाकार घेण्‍याचीही आमची तयारी आहे. यामुळे वेस्ट बँक आणि गाझा पट्टी या दोन्ही ठिकाणी पॅलेस्टिनींना त्यांच्या घरी परतण्याचे दरवाजे खुले होतील.”

हेही वाचा : 

 

Back to top button