China : सहा महिन्यांपासून बेपत्ता; माजी चिनी परराष्ट्रमंत्री मृत! | पुढारी

China : सहा महिन्यांपासून बेपत्ता; माजी चिनी परराष्ट्रमंत्री मृत!

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : गेल्या 6 महिन्यांपासून बेपत्ता असलेले चीनचे माजी परराष्ट्रमंत्री किन गँग यांचा मृत्यू झाल्याचा दावा अमेरिकेतील माध्यमांनी केला आहे. किन यांनी एकतर आत्महत्या केली आहे किंवा अतोनात शारीरिक छळ झाल्याने त्यांच्यावर मृत्यू ओढविला, असेही या वृत्तांतून नमूद आहे. (China)

‘पॉलिटिको’ या माध्यम संस्थेने आधी असे वृत्त दिले. दोन चिनी अधिकार्‍यांचा हवालाही वृत्तात दिला आहे. बीजिंगमधील लष्करी रुग्णालयात किन जुलैमध्येच मरण पावले आहेत. ते चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय होते, पण हेरगिरीच्या आरोपावरून त्यांना जुलै महिन्यात परराष्ट्र मंत्री पदावरून हटवण्यात आले होते. एका प्रसिद्ध दूरदर्शन निवेदिकेसह प्रेम प्रकरणावरूनही त्यांना लक्ष्य करण्यात आले होते, असे ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या दैनिकाच्या वृत्तात म्हटलेले आहे. किन हे 25 जूनला शेवटचे दिसले होते.

मेमध्ये गँग होते गोव्यात

मे महिन्यात गोवा येथे झालेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत किन गँग चीनच्या वतीने सहभागी झाले होते. 25 जून रोजी रशियन, श्रीलंकन आणि व्हिएतनामच्या अधिकार्‍यांसह झालेल्या बैठकीत ते अखेरचे दिसले होते. किन गँग कुठे दिसत नाहीत म्हटल्यावर 7 जुलै रोजी माध्यमांनी विचारणा केली, त्यावर आमच्याकडे काहीही माहिती नाही, असे उत्तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले होते. 10 आणि 11 जुलै रोजी किन हे इंडोनेशियातील शिखर परिषदेत सहभागी होणार होते. ते येणार नाहीत, एवढीच माहिती चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या संकेतस्थळावर झळकली, त्यानंतर किन गँग आजतागायत पडद्याआड आहेत.

हेही वाचा : 

Back to top button