सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ता हवी, विदर्भाशी काही घेणेदेणे नाही; आमदार यशोमती ठाकूर यांची टीका | पुढारी

सत्ताधाऱ्यांना फक्त सत्ता हवी, विदर्भाशी काही घेणेदेणे नाही; आमदार यशोमती ठाकूर यांची टीका

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : हिवाळी अधिवेशन पूर्ण एक महिना घ्या, दहा दिवसात किती कामकाज होणार आहे, असा सवाल उपस्थित करून सत्तेतील लोकांना विदर्भाशी काही एक देणं घेणं नाही, यांना केवळ सत्ताकारणात इंटरेस्ट आहे, असा आरोप काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

विरोधात असताना सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी एक ते दोन महिना विदर्भात अधिवेशनाची मागणी केली होती. आता ते सत्तेत आहेत. त्यामुळे त्यांनी एक महिना किंवा निदान 20 ते 25 दिवस नागपुरात हिवाळी अधिवेशन घ्यायला पाहिजे, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली आहे. हे सरकार या-त्या पक्षाची तोडफोड करून बनले आहे. यांना जनतेच्या कामाशी काही देणे-घेणे नाही अशी टीका त्यांनी केली.

विदर्भात आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. विदर्भात होणाऱ्या या अधिवेशनात विदर्भातीलच प्रश्न प्रलंबित राहतात. त्यामुळे सत्ताधारी सध्या खेळ खंडोबा करीत असून त्यांना केवळ सत्ताकारणात इंटरेस्ट आहे. जनतेच्या कामांमध्ये नाही, असे त्या म्हणाल्या.

विदर्भात एक महिना अधिवेशन राहिले पाहिजे अशी मागणी करणारे सत्तेत आल्यानंतर केवळ सहा दिवस कामकाज ठेवतात.
हे अधिवेशन हे नागपूर,अमरावती या विभागावर व विदर्भातील अन्य जिल्ह्यावर अन्याय होऊ नये म्हणून येथे घेण्याचा निर्णय झाला होता. मात्र, येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत त्या वाढतच आहेत, इतरही अनेक समस्या येथे आहेत असेही आमदार ठाकूर म्हणाल्या.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाल्यानंतर विरोधकांनी विदर्भात होणारे हे अधिवेशन संपूर्ण एक महिना घेण्याची मागणी केली आहे. मात्र हे अधिवेशन दहा दिवस नागपुरात चालणार आहे.

सरकार टाइमपास करत आहे

मुंबईतून सगळी मोठी यंत्रणा अधिवेशन काळात नागपुरात आणली जाते. यावर मोठ्या प्रमाणात जनतेच्या टॅक्सच्या पैसा खर्च होतो. त्याचा सदुपयोग होत नाही. विदर्भाचे अनेक विषय आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, तुटपुंजी मदत विदर्भातील शेतकऱ्यांच्या वाटेवर आली आहे. त्यामुळे एकूणच सरकार टाइमपास करते आहे. शेतकऱ्यांच्या, लोकांच्या कामांमध्ये सरकारला अजिबात इंटरेस्ट नसून यांना केवळ सत्ताकारणामध्ये इंटरेस्ट आहे. सत्तेमध्ये असलेले विदर्भातील विद्यमान उपमुख्यमंत्री आणि एकेकाळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी विदर्भाच्या समस्यांकडे लक्ष द्यायला हवे होते. मात्र, तेही दुर्लक्ष करत असल्याची टीका आमदार ठाकूर यांनी केली.

Back to top button