चॅटीजीपीटी सोडाच माणसाचा ही बाप ठरणारे Q* वाढवतेय काळजी; आल्टमन यांच्या नवनिर्मितीमुळे धोक्याची घंटा

चॅटीजीपीटी सोडाच माणसाचा ही बाप ठरणारे Q* वाढवतेय काळजी; आल्टमन यांच्या नवनिर्मितीमुळे धोक्याची घंटा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅट जीपीटीची निर्मिती करणाऱ्या OPEN AI या कंपनीने काही दिवसांपूर्वी सीईओ सॅम ऑल्टमन यांना पदावरून हटवले, यावर बराच वादंग कॉर्पोरेट राजकारण झाल्यानंतर आल्टमन यांना पुन्हा या पदावर घेण्यात आले. या सगळ्या वादाच्या मागे OPEN AI बनवत असलेले नवे एआय टूल कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. (Open AI Q star project).

तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या आर्टिफिशिअल जनरल इंटेलिजन्ज (AGI) मॉडेल बनवण्यासाठी कार्यरत आहेत. यात आता OPEN AIने आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. OPEN AIने या नव्या प्रकल्पाला Q* ( उच्चार – क्यू स्टार) असे नाव दिलेले आहे. AGI निर्मितीतील सर्वांत मोठं यश म्हणून याकडे पाहिले जात आहे, तर दुसरीकडे Q* मानवजातीला धोका ठरेल असेही म्हटले जात आहे, असे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे.

चॅटजीपीटी आणि Q* मध्ये फरक  | (Open AI Q star project)

चॅटजीपीटी आपल्याला जी उत्तर देते त्यासाठीचा डेटा आधी चॅटजीपीटी फीड करण्यात आलेला आहे. तर Q* एखाद्या गोष्टीची कारणीमीमांसा करू शकते, विचार करू शकते आणि एखादी गोष्ट समजून घेऊ शकते. Q*ला मॉडेल फ्री मेथड असे म्हटले जाते. असे मॉडेल पूर्वी फीड केलेल्या माहितीवर, ज्ञानावर आधारित नसतात. असे मॉडेल अनुभवावर उभे राहातात. त्यामुळे कम्प्युटरतज्ज्ञ अशा मॉडेलना फार जास्त क्षमता असेल असे सांगतात. मनुष्य ज्या प्रकारे विचार करतो, त्या प्रकारे Q* विचार करू शकते.

Q*नेमके काय करणार, याचीच भीती | (Open AI Q star project)

पण Q* जेव्हा प्रत्यक्षात वापरले जाईल, तेव्हा मनुष्यजातीवर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतील असे सांगितले जाते. सॅम आल्टमन यांना सीईओ पदावरून हटवले जात असताना Q* हेच कारण होते असे सांगितले जाते. सॅम आल्टमन यांनीही AGIच्या निर्मितीवरून चिंता व्यक्त केली होती. सॅम आल्टमन यांनी AGIचा उल्लेख माणसाचा सहकारी कामगार असा केला होता, त्यामुळे AGI माणसाची जागा घेऊन बेरोजगारीचे संकट वाढेल अशी शंका व्यक्त केली जाते. माणसासारखी विचार करण्याची आणि कारणीमीमांसा करण्याची क्षमता Q* मध्ये असेल असे संशोधक सांगतात. पण विशेष म्हणजे Q* या मॉडेलबद्दलच काही अंदाज बांधता येत नाही, ज्याबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नाही, त्या सुधारणा तरी कशा करणार असा प्रश्न व्यक्त केला जात आहे.

नोकऱ्यांवर गदा, बेरोजगारीचे संकट

तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांचा वेग अचंबित करणारा आहे. हे बदल स्वीकारण्याची आणि नवी कौशल्य आत्मसात करण्याची क्षमता सर्वांचीच असणार नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्यांवर गदा येईल आणि बेरोजगारी वाढेल.

अनियंत्रित शक्ती

हे तंत्रज्ञान जर समाजकंटकांच्या हाती पडले तर काय होईल, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. चुकीच्या हाती पडणारे शक्तिशाली तंत्रज्ञान माणसासाठी फार मोठे संकट ठरू शकते. अगदी चांगल्या कामासाठी जरी वापर करायचे ठरवले तरी Q*ची विचार करण्याची क्षमता, कारणीमीमांसा करण्याची शक्ती यामुळे फलनिष्पत्ती धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मनुष्य विरुद्ध यंत्र

हॉलिवुडच्या अनेक चित्रपटांतून मनुष्य विरुद्ध यंत्र हा संघर्ष दाखवण्यात आला आहे. हा संघर्ष निव्वळ कल्पनाच नाही तर प्रत्यक्षातही हा संघर्ष Q* सारख्या अत्याधुनिक एआयमुळे निर्माण होऊ शकेल, याची भीती तज्ज्ञांना वाटते. विचार करण्याची क्षमता असलेले मशिन जर माणसाच्या विरोधात वागू लागले तर काय परिस्थिती निर्माण होईल, अशी भीत तज्ज्ञ व्यक्त करतात.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news