वॉशिंग्टन : 'ओपन एआय' या कंपनीने 'चॅट जीपीटी' हा चॅटबॉट आणून जगभरात खळबळ माजवली होती. 'चॅट जीपीटी'चा कसा उपयोग आणि दुरुपयोग होऊ शकतो, याची चर्चा सर्वत्र झडली. आता या कंपनीने पुढचे पाऊल टाकले आहे. कंपनीने आपल्या 'क्यू स्टार आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स प्रोजेक्ट'ची सुरुवात केली आहे. आतापर्यंत असे म्हटले जात होते की, 'एआय'मुळे नोकर्या घटतील. मात्र, आता या नव्या प्रोजेक्टने मानवतेलाच धोका निर्माण झाला आहे. यापासून तयार करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये माणसांसारखी बुद्धी आणि शिकण्याची क्षमतादेखील असेल. तसेच केलेल्या चुका आणि प्रत्येक गोष्टीतून ही उपकरणे शिकू शकतील. शिकण्याच्या या क्षमतेमुळे ते स्वत:मध्ये आणखी सुधारणा करत जातील. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे सोपे राहणार नाही. हेदेखील शक्य आहे की, ते स्वत: स्वत:लाच नियंत्रित करायला लागतील.
अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, माणसांसारखी बुद्धी व अमर्याद ताकदीमुळे ते मानवतेलाच धोक्यात टाकू शकतात. वस्तुत: क्यू स्टार एखाद्या अल्गोरिदमवर काम करत नाही. जिथे चॅटजीपीटी उपलब्ध डेटाच्या आधारे उत्तर देते तिथे क्यू स्टार विचार करून डेटाचे 'इंटरप्रिटेशन' करू शकतो. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यामध्ये अद्भुत क्षमता असेल. ते माणसांप्रमाणेच, पण माणसांपेक्षा कित्येक पट वेगाने काम करू शकेल. ओपन एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनीदेखील या प्रोजेक्टबाबत मत मांडले आहे. त्यांनी यास माणसांचा सहकारी म्हटले आहे. यामुळे 3 मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्या पुढीलप्रमाणे :
1) बेरोजगारी : जुन्या कौशल्यावर आधारित नोकर्या मिळण्याच्या शक्यता संपतील. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करू शकणार्या कौशल्याची गरज भासेल. तंत्रज्ञानामुळे काही लोक प्रगती करतील; पण बहुतांश लोक बेरोजगार होतील.
2) अमर्याद ताकद : क्यू स्टारसारख्या एआय तंत्रज्ञानाकडे अमर्याद ताकद असेल. ते स्वत:ला अपडेट करत अधिक सुधारणा करत राहील. आपल्याला वास्तवात त्याबाबत पूर्णपणे काहीच कळणार नाही. म्हणून त्यावर नियंत्रण ठेवणे जास्त कठीण जाईल.
3) मानवाशी संघर्ष : हे शक्य आहे की, माणूस आणि यंत्र एकाच वेळी कामे करतील. आतापर्यंत यंत्रांच्या माध्यमातून माणसे काम करतात. मात्र, तेव्हा शक्य आहे की, सर्वात मोठे काम स्वत:ला अपडेट करणार्या यंत्रांना नियंत्रित करण्याचे असेल. त्यामुळे भविष्यात माणूसच अशा यंत्रांच्या विरोधात उभा ठाकू शकतो.