World AIDS Day : आता १५ मिनिटांत घरच्या घरी करता येणार एचआयव्ही टेस्ट! | पुढारी

World AIDS Day : आता १५ मिनिटांत घरच्या घरी करता येणार एचआयव्ही टेस्ट!

लंडन/नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एक अत्यंत चांगली बातमी जागतिक एडस्दिनी प्रसारित झालेली आहे. घरच्या घरीही एचआयव्ही चाचणी करता येईल, असे जगातील पहिले (फर्स्ट अ‍ॅट होम एचआयव्ही टेस्टस्) किट टेस्को सुपर मार्केटमध्ये दाखल झाले आहे! या किटच्या मदतीने एखादी व्यक्ती अवघ्या पंधरा मिनिटांत स्वत:ला एचआयव्हीची बाधा झाली आहे की नाही, ते तपासू शकणार आहे. (World AIDS Day)

एचआयव्ही एडस्… छुने से एडस् नहीं, प्यार फैलता हैं, असे किती जरी म्हटले तरी या आजाराचे नुसते नाव ऐकले की धसका बसतो. अलीकडे या आजारासह रुग्ण दीर्घायुष्य जगू शकेल, असा औषधोपचार होतो. पण तो दुरुस्त करू शकेल, असा उपचार समोर आलेला नाही. म्हणूनच जराशा दुर्लक्षानेही या आजाराची लागण कुणाला होऊ नये म्हणून दवाखान्यांतून दाखल होणार्‍या प्रत्येक रुग्णाची एचआयव्ही चाचणी आवश्यक करण्याकडे जगभरातील वैद्यकीय क्षेत्राचा कल आहे.

ब्रिटनमध्ये अलीकडेच झालेल्या एका संशोधनातून बहुतांश लोक एचआयव्ही बाधितासह मैत्री करण्यास वा त्याच्यासोबत सहकारी म्हणून काम करण्यास अनुकूल नसल्याचे समोर आलेले आहे. एचआयव्हीची लागण कशी होते, याबाबत एवढी जागरूकता येऊनही अनेक महाभागांना एकाच ग्लासातून पाणी प्यायल्यानेही एचआयव्हीची लागण होते, असे वाटते. सर्वेक्षणातील तीन टक्के लोक तर गजब होते. हस्तांदोलनानेही एचआयव्हीची देवाणघेवाण होते, असे त्यांचे मत होते. हे सारे चुकीचे असले तरीही एचआयव्हीबद्दल गंभीर असूच नये, हा मात्र त्याचा अर्थ नाही. (World AIDS Day)

उदाहरणार्थ… ब्रिटनमध्ये विषमलिंगी जोडप्यांना आपल्याला जोडीदाराकडून लागण होऊ शकते, असे क्वचितच वाटते. याउपर यूके हेल्थ केअर सिक्युरिटीच्या डेटातून अशा जोडप्यांमध्येही एचआयव्हीची लागण लक्षणीय प्रमाणात आढळून आलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे नव्या टेस्ट किटस्च्या माध्यमातून एचआयव्ही निदान 99 टक्के क्युरेट असते, हा उत्पादकांचा (न्यूफाऊंडलँड डायग्नोस्टिक्स) दावा आहे. अवघ्या पंधरा मिनिटांत हे निदान होते, असेही कंपनीने म्हटलेले आहे. बोटातून काढलेल्या रक्ताच्या थेंबाआधारे एचआयव्ही टाईप 1 आणि एचआयव्ही टाईप 2 या विषाणूंचे रक्तातील अस्तित्व किटच्या पट्टीवर (स्क्रीनवर) दिसेल.

पानिपत शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रियेपूर्वी एचआयव्ही टेस्ट!

पानिपत : हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतून शस्त्रक्रियेपूर्वी प्रत्येक रुग्णाची एचआयव्ही टेस्ट आवश्यक करण्यात आली आहे. अलीकडेच हा निर्णय झाला. एचआयव्ही बाधितांच्या सातत्याने वाढत असलेल्या संख्येच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ सर्जन डॉ. विजय मलिक यांनी सांगितले. प्रत्येक रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी वेगवेगळी अवजारेही आम्ही वापरू शकत नाही. एखाद्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान अवजारे संक्रमित झाली तर तुम्ही विचार करा, पुढचे किती रुग्ण संक्रमित होऊ शकतात, असेही ते म्हणाले. (World AIDS Day)

हेही वाचा :

 

 

Back to top button