पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्धाला आता एक महिन्याचा काळ लोटला आहे. (Israel-Hamas War) दोन्ही बाजूंनी सुरु असलेल्या या रक्तरंजित संघर्षामुळे संपूर्ण जगावरील तणाव वाढला आहे. दिवसोंदिवस हे युद्ध अधिकच चिघळत चालल्याचे चित्र आहे. आतापर्यंत या संघर्षात सुमारे 11 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीतील मानवतावादी संकटाचा हवाला देत अनेक देश इस्रायलकडे हल्ला थांबवण्याची मागणी करत आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू ( PM Netanyahu) यांनी युद्धविरामावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, गाझापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी किंवा ओलीसांना बाहेर काढण्यासाठी युद्धाला थोडा विराम देण्याचा विचार करू;पण युद्धानंतर अनिश्चित काळासाठी इस्रायलने पॅलेस्टिनी प्रदेशांवर सुरक्षा जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. मानवतावादी संकटामुळे युद्ध थांबवण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांवर ते म्हणाले की, सामान्य युद्धविराम युद्ध प्रयत्नांना अडथळा आणेल.
हमासचे म्हणणे आहे की गाझावर हल्ला होत असताना ते ओलीस सोडणार नाहीत किंवा लढाई थांबवणार नाहीत. हमास-नियंत्रित क्षेत्रातील आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत किमान 10,022 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, ज्यात 4,104 मुलांचा समावेश आहे. गाझा शहरातील अन्न आणि शुद्ध पाणी संपत चालले आहे आणि मदत वितरण पुरेशी नाही. गाझा शहरातील युद्धग्रस्त नागरिकांना मदत पोहचवण्यासाठी अमेरिकेने युद्ध विरामासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.मात्र, युद्ध पूर्णपणे थांबवणार नसल्याचे इस्रायलने स्पष्टपणे सांगितले आहे.
हेही वाचा :