Israel-Hamas War : इस्रायलला हादरवणारा पॅलेस्टिनी दहशतवादी मोहम्मद डीफ | पुढारी

Israel-Hamas War : इस्रायलला हादरवणारा पॅलेस्टिनी दहशतवादी मोहम्मद डीफ

श्रीकांत देवळे, आंतरराष्ट्रीय अभ्यासक

गाझापट्टीवरून इस्रायलवर हजारो रॉकेटस् सोडली जात होती, तेव्हा पॅलेस्टिनी दहशतवादी मोहम्मद डीफच्या एका ऑडिओ टेपचे प्रसारण सुरू होते. इस्रायलचा मोस्ट वाँटेड दहशतवादी असणार्‍या डीफने, त्या टेपमध्ये अल अक्सा फ्लड नावाने एक संकेत दिला आणि हा हल्ला जेरुसलेमच्या अल अक्सा मशिदीवरील केलेल्या कारवाईचा बदला आहे, असे सांगितले. इस्रायलच्या सात हल्ल्यांत बचावलेल्या आणि विज्ञान शाखेतून पदवी घेतलेल्या डीफला, आजघडीला कधीही सार्वजनिकरीत्या वावरताना पाहिले गेले नाही.

गाझापट्टीवरून इस्रायलवर हजारो रॉकेटस् सोडली जात होती, तेव्हा पॅलेस्टिनी दहशतवादी मोहम्मद डीफच्या एका ऑडिओ टेपचे प्रसारण सुरू होते. इस्रायलचा मोस्ट वाँटेड दहशतवादी असणार्‍या डीफने, त्या टेपमध्ये अल अक्सा फ्लड नावाने एक संकेत दिला आणि हा हल्ला जेरुसलेमच्या अल अक्सा मशिदीवरील केलेल्या कारवाईचा बदला आहे, असे सांगितले. इस्लाम धर्मातील तिसर्‍या क्रमांकाचे पवित्र ठिकाण म्हणून ओळखल्या जाणार्‍या अल अक्सावर, मे 2021 रोजी इस्रायलने केलेल्या कारवाईने अरब आणि मुस्लिम जगाची नाराजी ओढवून घेतली होती. तेव्हाच डीफने हल्ल्याची योजना आखण्यास सुरुवात केली होती, असे म्हटले जात आहे.

प्रत्यक्षात धर्म आणि सार्वभौमत्वाच्या नावावर सुरू असलेल्या हिंसाचारात जेरुसलेम हे केंद्रस्थानी राहिले आहे. तेथे इस्रायलच्या कारवाईनंतर इस्रायल आणि हमास यांच्यात 11 दिवस युद्ध चालले. इस्रायलच्या सात हल्ल्यांत बचावलेल्या डीफला, आजघडीला कधीही सार्वजनिकरीत्या वावरताना पाहिले नाही. त्याचा आवाजही खूप कमी ऐकू येतो. 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या टीव्ही चॅनेलवर डीफ बोलणार असल्याची घोषणा झाली, तेव्हाच पॅलेस्टिनी नागरिकांना काहीतरी गडबड होणार असल्याची कुणकुण लागली. टीव्हीवर प्रसारित झालेल्या टेपमध्ये डीफ म्हणाला, ‘अल अक्सावरील हल्ल्यांमुळे निर्माण झालेला संताप आणि राग हा लोकांच्या मनात आणि देशात खदखदत आहे. आमच्या मुजाहिद्दीन लोकांनो, या गुन्हेगारांना तुमचा काळ आता संपला आहे.’ हे सांगण्याचा दिवस आला आहे.

डीफ याचे केवळ तीनच फोटो आहेत. त्यातील एक खूप तरुण वयातला म्हणजे तो 20 वर्षांचा असतानाचा आहे. दुसर्‍या छायाचित्रात त्याच्या चेहर्‍यावर मास्क आहे आणि तिसर्‍या फोटोत केवळ त्याची सावली आहे. हे फोटो ऑडिओ टेपच्या प्रसारणाच्या वेळी दाखविले गेले. डीफ कोठे आहे, याचा थांगपत्ता कोणालाही नाही. अर्थात, गाझा भागातल्या भुयारातील नेटवर्कमध्ये तो असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे म्हटले जाते, हल्ला करण्याचा निर्णय हा डीफ आणि याह्य सिनवार यांनी घेतला. डीफ हा हमासच्या अल कासीम बि—गेडचा प्रमुख आहे, तर सिनवार हा गाझात हमासचा नेता आहे. अर्थात, हल्ल्याचा संपूणर्र् मास्टरमाईंड हा एकच होता. या मोहिमेची माहिती हमासमधील काही मूठभर लोकांनाच होती.

हल्ल्याची गोपनीयता एवढी होती की, इस्रायलने घोषित केलेला शत्रू आणि हमाससाठी पैसे देणारा, प्रशिक्षण देणारा, शस्त्रांचा प्रमुख स्रोत असणार्‍या इराणलाही या हल्ल्याची माहिती नव्हती. हमास एक मोठी मोहीम आखण्याची तयारी करत आहे, हे इराणला ठाऊक होते. या हल्ल्यात इराणचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचेही अमेरिकेने म्हटले आहे. हमास, पॅलेस्टिनी नेतृत्व, इराणसमर्थक लेबनॉन कट्टरपंथीय गट हिजबुल्लाह आणि इराणच्या एकत्र बैठकीतही या हल्ल्याबाबत चर्चा झाली नव्हती.

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांनी 10 ऑक्टोबर रोजी म्हटले की, आपला देश इस्रायलवरील हल्ल्यात सहभागी नाही. एका अर्थाने डीफने योजना गुप्त ठेवण्यासाठी बरीच तयारी केली होती. इस्रायललाही गाफील ठेवले आणि हमास आता हल्ला करण्याच्या मूडमध्ये नाही, असे भासविले गेले. याउलट गाझाचा आर्थिक विकास करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, हमासच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. अनेकदा तर हे काम इस्रायल सैनिकांदेखत झाले होते. हमासच्या परराष्ट्र संबंधांचे प्रमुख अली बराका याने म्हटले की, या हल्ल्यांसाठी हमासच्या दहशतवाद्यांनी दोन वर्षे तयारी केली. टीव्हीवरील प्रसारित टेपमध्ये डीफने म्हटले की, हमासने अनेकदा इस्रायलला पॅलेस्टिनी नागरिकांविरुद्धची कारवाई थांबवणे, कैद्यांना सोडून देण्याचे आवाहन केले होते. अत्याचार केले जात होते. पॅलेस्टिनींनी जमीन ताब्यात घेण्याचे थांबवावे, असेही आवाहन केले होते.

1965 मध्ये गाझाच्या खान युनिस येथील निर्वासितांच्या छावणीत मोहम्मद मासरीच्या रूपातून डीफचा जन्म झाला. ही छावणी 1948 नंतर अरब- इस्रायल संघर्षानंतर निर्वासितांसाठी उभारली होती. 1987 मध्ये पॅलेस्टिनीचे पहिले बंड सुरू झाले आणि यादरम्यान हमासशी संपर्कात आल्यानंतर त्याला मोहम्मद डीफ म्हटले गेले. त्याने गाझाच्या इस्लामिक युनिव्हर्सिटीत विज्ञानात पदवी प्राप्त केली. विद्यापीठात त्याने भौतिक, रसायन आणि जैवविज्ञानाचा अभ्यासही केला. युनिव्हर्सिटीच्या एंटरटेन्मेंट कमिटीचा प्रमुख म्हणूनही त्याने कलेतही आवड दाखविली आणि व्यासपीठावर कॉमेडियनच्या रूपातून कलाही सादर केली. हमासला पुढे नेण्याबराबेरच डीफने भूसुरुंगाचे नेटवर्क तयार करण्याचे काम केले आणि बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षणही घेतले.

आत्मघाती बॉम्बस्फोटाच्या माध्यमातून डझनभर इस्रायल नागरिकांच्या हत्येला त्यालाच जबाबदार मानले जाते. डीफसाठी ‘लपणे’ हा त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. इस्रायलने त्याला मारण्यासाठी सात वेळेस प्रयत्न केले; मात्र तो वाचला. एका हल्ल्यात त्याने डोळा गमावला आणि पायाला मारही लागला. हमासच्या सशस्त्र गटाचे नेतृत्व करताना त्याने पॅलेस्टिनी लोकनायकाचा दर्जा मिळविला. व्हिडीओत तो मास्क घातलेला दिसतो आणि त्यानंतर त्याची सावली दिसते. डीफला मारण्याचा सर्वात अलीकडचा प्रयत्न मे 2021 मध्ये ऑपरेशन गार्झीयन ऑफ द वॉल्सदरम्यान झाला. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने 8 सप्टेंबर 2015 रोजी डीफला जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत सामील केले आहे.

Back to top button