covid in Austria : ऑस्‍ट्रियामध्‍ये लस न घेणार्‍यांनी आता घरातच राहायचं! | पुढारी

covid in Austria : ऑस्‍ट्रियामध्‍ये लस न घेणार्‍यांनी आता घरातच राहायचं!

व्हिएन्ना : पुढारी ऑनलाईन

युरोप पुन्‍हा एकदा कोरोना महामारीचे केंद्र झाले आहे, असे जागतिक आरोग्‍य संघटनेने म्‍हटलं आहे. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग पश्‍चिम युरोपमध्‍ये हाेत आहे. यामुळेच येथील काही देशांमध्‍ये पुन्‍हा लॉकडाउन लागू करण्‍याची नामुष्‍की ओढावली आहे. देशातील वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येमुळे लस न घेणार्‍या नागरिकांवर कडक निर्बंध लादण्‍याचा निर्णय ऑस्‍ट्रिया सरकारने (covid in Austria) घेतला आहे.

covid in Austria : लस न घेणार्‍यांवर लादणार कडक निर्बंध

ऑस्‍ट्रिया सरकारने (covid in Austria) कोरोना प्रतिबंधक लस घेणे सक्‍तीचे केले आहे. तसेच लस घेतलेली नाही, अशा नागरिकांना आता सोमवारपासून घरातून बाहेर पडण्‍यास बंदी घालण्‍यात येणार आहेत. अत्‍यावश्‍यक वस्‍तूंची खरेदी, डॉक्‍टरांची भेट घेणे, ऑफीसला जाणे बंद होणार आहे. यासंदर्भातील नवा कायदा आणण्‍यासाठी सरकार प्रयत्‍नशील असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

पश्‍चिम युरोपमध्‍ये कोरोनाने पुन्‍हा डोके वर काढले

सुमारे दोन वर्षांनंतर पश्‍चिम युरोपमधील जर्मनी आणि ब्रिटन या देशांमध्‍ये पुन्‍हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले आहे. वैद्‍यकीय क्षेत्रातील तज्‍ज्ञांसाठी ही चिंताजनक बाब आहे. कारण युरोपमध्‍ये कोरोना प्रतिंबधक लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. पश्‍चिम युरोपमधील सर्वच देशांमधील लसीकरण ६० टक्‍क्‍यांहून अधिक आहे. तरीही वाढत्‍या रुग्‍णसंख्‍येमुळे युरोपमधील काही देशात पुन्‍हा लॉकडाउनची लागू केले आहे. युरोपमध्‍ये मागील काही आठवड्यांपासून कोरोनामुळे मृत्‍यू झालेल्‍या रुग्‍णांमध्‍ये १० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे, असे जागतिक आरोग्‍य संघटनेने म्‍हटलं आहे.

‘दुसर्‍या डोसमधील अंतर वाढल्‍याने रुग्‍णसंख्‍येत वाढ’

लॉकडाउन हटविण्‍यात आल्‍यानंतर सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्‍याचबरोबर अद्‍याप एकही लस न घेतलेले आणि पहिला डोस घेवून अधिक काळ झालेल्‍यांमधील प्रतिकार शक्‍ती कमी होत आहे. त्‍यामुळेच पुन्‍हा एकदा कोरोना रुग्‍णसंख्‍या वाढताना दिसत आहे, अशी माहिती एक्‍सेटर विद्‍यापीठाचे वरिष्‍ठ प्राध्‍यापक डॉ. भारत पनखानिया यांनी दिली. नेदरलँडमध्‍ये रुग्‍णसंख्‍येत वाढ होत आहे. रुग्‍णसंख्‍येतील वाढ कायम राहिल्‍यास परिस्‍थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा देशातील आरोग्‍य विभागाने दिला आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button