GROUNDNUT : भुईमुगासाठी इक्रिसंट तंत्रज्ञान | पुढारी

GROUNDNUT : भुईमुगासाठी इक्रिसंट तंत्रज्ञान

- प्रसाद पाटील

भुईमुगाची लागवड आपल्या शेतकरी बांधवांना नवीन नाही. परंतु, भुईमुगाचे पीक (GROUNDNUT) पाण्यात अतिशय संवेदनशील आहे. त्यास पाणी जास्त झालेले चालत नाही. म्हणून लागवड पद्धतीत थोडासा बदल करून शास्त्रज्ञांनी भुईमूग लागवडीचे इक्रिसंट तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. यात भुईमुगाची लागवड (GROUNDNUT) ही रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने केली जाते. त्यामुळे बनणारे गादी वाफे मऊ आणि भुसभुशीत असतात.

इक्रिसंट पद्धतीने फायदे

यामध्ये वाफे 12.5 ते 15 से.मी. उंचीचे असल्याने जादा झालेले पाणी निचरून दोन्ही बाजूंच्या पाटात जाते. पाटाचा रस्ता म्हणून वापर करता येतो, शिवाय शेतीच्या आंतरमशागतीची सर्वच कामे जसे खते टाकणे, पेरणी करणे, आंतरमशागत करणे, कीडनाशक फवारणे, खुरपणी करणे, स्प्रिंकलर लावणे, पिकाची वेळोवेळी निरीक्षण करणे, पिकाची काढणी करणे अशी सर्वच कामे पाटातून केल्यामुळे रुंद वरंब्यावर जमिनीची तुडवणूक होत नाही.

या तंत्रज्ञानाने बनणारे गादी वाफे हे भुसभुशीत राहणारे आणि योग्य असे पाण्याचे प्रमाण धारण करणारे असल्यामुळे भुईमुगाच्या मुळांवर नत्राच्या गाठींची वाढ चांगली होते आणि नत्राचे स्थिरीकरण होण्यास मदत होते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत पिकाची वाढ झपाट्याने आणि जोमदार होते. पानांचा आकार वाढून जमीन लवकर झाकली जाते आणि पीक गडद हिरव्या रंगाचे दिसते. पिकाची वाढ एकसारखी होते. जमीन भुसभुशीत असल्यामुळे आर्‍या जमिनीत सहज घसून शेंगात पोसतात, शेंगाचा आकार वाढतो आणि शेंगात दाणे व्यवस्थित भरतात. पीक काढणीच्या वेळी पाणी साठत नसल्यामुळे शेंगांना बुरशी लागण्याचे प्रमाण कमी होते आणि पीक सहज उपटले जाऊन काढणीच्या वेळी शेंगा जमिनीत राहत नाहीत.

हे ही वाचा :

Back to top button