Li Keqiang : चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन | पुढारी

Li Keqiang : चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्‍तसेवा चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते शांघायमध्ये होते. गुरुवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर आज (शुक्रवार) त्यांचे निधन झाले. (Li Keqiang)

चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. चीनच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार केकियांगचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. चीनच्या सरकारी टीव्ही चॅनल सीसीटीवीने वृत्‍त दिले की, ली केकियांग काही काळ शांघायमध्ये सुट्टी घालवत होते. 26 ऑक्टोबर रोजी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्‍यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला, पण 27 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.

2022 मध्ये त्यांच्या निवृत्तीपर्यंत, ते सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (CCP) मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली नेते होते. 2012 ते 2022 दरम्यान पक्षाच्या पॉलिटब्युरोचे सदस्य म्हणून ते चीनचे सर्वोच्च आर्थिक अधिकारीही राहिले आहेत. त्यांनी बाजार सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.चीनच्या प्रतिष्ठित पेकिंग विद्यापीठात शिकलेल्या ली यांच्याकडे एकेकाळी पक्ष नेतृत्वाचा दावेदार म्हणून पाहिले जात होते, परंतु अध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांना बाजूला सारणे सुरू केले होते, असे म्हटले जाते.

ली केकियांग यांनी 2013 ते 2023 पर्यंत चीनचे पंतप्रधानपद भूषवले आहे. ते 2012 ते 2022 पर्यंत सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे दुसरे सर्वात शक्तिशाली सदस्य होते. ली यांचा जन्म 1955 मध्ये हेफेई, अन्हुई प्रांतात झाला. इंग्रजी भाषा आणि साहित्याचे माजी प्राध्यापक चेंग हाँग यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.

हेही वाचा : 

Back to top button