सुनील तटकरे
सुनील तटकरे

मराठा आरक्षणासाठी धीर धरा! सुनील तटकरे यांचे तरुणांना आवाहन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सकल मराठा समाजाच्या मोर्चांना कुठेही गालबोट लागले नाही. मात्र, हिंसक आणि आत्महत्यासारख्या घटनेने या आंदोलनाला वेगळेच वळण लागण्याची भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून तरुणांनी धीर धरावा, असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

तटकरे म्हणाले, सरकारने आरक्षणासाठी पाऊले उचलली आहेत. आरक्षण टिकले पाहिजे व त्याला कायद्याचाही आधार असला पाहिजे यासाठी सरकारकडून मार्ग काढला जाईल. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे.
राज्यात फडणवीस सरकार असताना मराठा आरक्षण दिले होते. पण महाविकास आघाडीला उच्च न्यायालयात ते टिकवता आले नाही. आता काही कायदेशीर बाबी नमूद करून आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्यावे ही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांची भूमिका आहे. पण ते आरक्षण कायद्याच्या कसोटीत टिकले पाहिजे, असे मराठा नेतृत्वांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकत शिंदे समिती स्थापन केली आहे. आता ही समिती राज्यव्यापी दौरा करत आहे. इतकेच नाहीतर आरक्षण देण्याबाबत महायुतीतील सर्व पक्ष सकारात्मक आहेत, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले. ड्रग्ज प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहेत. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

logo
Pudhari News
pudhari.news