अणुचाचणी टाळण्‍यासाठी बिल क्लिंटन यांना दिली होती पाच अब्‍ज डॉलरची ऑफर : नवाज शरीफ | पुढारी

अणुचाचणी टाळण्‍यासाठी बिल क्लिंटन यांना दिली होती पाच अब्‍ज डॉलरची ऑफर : नवाज शरीफ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Nawaz Sharif) शनिवारी तब्‍बल चार वर्षांनंतर मायदेशी परतले आहेत. मागील चार वर्ष त्‍यांचे वास्‍तव्‍य इंग्‍लंडमध्‍ये होते. पाकिस्‍तान परतल्‍यानंतर काही तासातच त्‍यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे सर्वेसर्वा नवाज शरीफ शनिवारी दुबईहून एका विशेष विमानाने इस्लामाबादमध्‍ये आले. यावेळी मीनार-ए-पाकिस्तान येथे जाहीर सभेत बोलताना शरीफ म्‍हणाले की, आज मी अनेक वर्षांनी माझ्‍या देशवासीयांना भेटत आहे. तुमच्यासोबतचे माझे प्रेमाचे नाते तसेच आहे. या नात्यात कोणताही फरक नाही.

बिल क्लिंटन यांना दिली होती पाच अब्‍ज डॉलरची ऑफर

भारताने १९९८ मध्‍ये अणुचाचणी घेतली. यानंतर पाकिस्‍तानला याला प्रत्‍युत्तर द्यायचे होते. मात्र यावेळी परकीय सरकारांकडून प्रचंड दबाव होता. १९९९ मध्‍ये अमेरिकेचे तत्‍कालिन राष्‍ट्राध्‍यक्ष बिल क्लिंटन होते. पाकिस्‍तानमधील अणूचाचणी टाळण्‍यासाठी त्‍यांनी मला पाच अब्ज डॉलर्सची ऑफर दिली. मलाही एक अब्ज डॉलर्सची ऑफर दिली जाऊ शकली असती; पण माझा जन्म पाकिस्तानच्या भूमीवर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात जे काही आहे ते मला मान्य होऊ दिले नाही, असेही शरीफ यावेळी म्‍हणाले.

माझ्‍या जागी दुसरे कोणी असते तर…

यावेळी पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्‍यावर निशाणा साधताना शरीफ म्‍हणाले, मला सांगा, माझ्या जागी दुसरे कोणी असते तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोर असे कोण बोलू शकले असते का. आम्ही अणुचाचण्या केल्या आणि अणुचाचण्या केल्याबद्दल भारताला प्रत्युत्तर दिले. यामुळेच आमच्याविरुद्ध निकाल दिला जातो का?”. मी कधीही माझ्‍या समर्थकांचा विश्वासघात केलेला नाही. माझ्‍या मुलीवर आणि पक्षाच्या नेत्यांवर खोटे गुन्हे नोंदवले गेले.”

नवाझ शरीफ यांना त्यांच्या देशापासून वेगळे करणारे ते कोण आहेत? आम्हीच पाकिस्तानची निर्मिती केली. आम्हीच पाकिस्तानला अणुशक्ती बनवलं. आम्ही लोडशेडिंग संपवलं, असा दावाही त्‍यांनी केला.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button