नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातून आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी अधिकृत भेट घेतली. पण या भेटीदरम्यानच ठाकरे यांनी मोदी यांची काही वेळ वैयक्तिक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत. याबद्दल ठाकरे यांना पत्रकार परिषदेत विचारले असता 'पंतप्रधानांना भेटण्यात गैर काय? ते नवाज शरीफ नाहीत' अशी प्रतिक्रिया दिली.
पंतप्रधान मोदी यांनी २०१५ साली पाकिस्तानात अचानक जाऊन त्यावेळचे पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. त्या भेटीवरून शिवसेनेने वारंवार पंतप्रधान मोदी यांना डिवचलेले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी मोदी-शरीफ भेटीचा संदर्भ डोळ्यासमोर ठेवत 'ते नवाज शरीफ नाहीत' अशी मल्लिनाथी केली. राज्याचे काही ज्वलंत प्रश्न आहेत. ते घेऊन मी सहकाऱ्यांसमवेत भेटीसाठी आलो आहे. या प्रश्नांवर मार्ग काढा, अशी विनंती पंतप्रधानांना वैयक्तिक भेटीत केल्याचे ठाकरे यांनी नमूद केले.
भाजप आणि शिवसेना यांची युती तुटल्यापासून या दोन्ही पक्षांतून विस्तवही जात नाही. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मोदी यांच्यासोबत काही काळासाठी झालेली ती भेट वैयक्तिक होती, त्यात राजकीय काहीही नव्हते, असे ठाकरे सांगत असले तरी राजकीय चष्म्यातूनही या भेटीकडे पाहिले जात आहे. दुसरीकडे राज्यातील भाजप नेत्यांना आपण विचारत नाही, ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे थेट लालकृष्ण अडवाणी यांच्याशी बोलायचे, त्याप्रमाणे आपण थेट भाजपचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी यांच्याशी बोलतो, असा संदेश उध्दव ठाकरे यांनी राज्यातील भाजप नेत्यांना दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
'पंतप्रधानांसोबत वैयक्तिक भेट झाली. सत्तेत एकत्र नसलो तरी याचा अर्थ नाते तुटले असा होत नाही' असे सांगतानाच ठाकरे यांनी आपल्याच पंतप्रधानांची भेट घेतल्याचे आवर्जून सांगितले. टोकाचे राजकीय मतभेद असले तरी पंतप्रधानांसोबत आपले संबंध चांगले असल्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीला दाखवून देण्याचा प्रयत्नही ठाकरे यांनी केला आहे.