Nawaz Sharif | चार वर्षांनंतर नवाझ शरीफ पाकिस्तानात परतले | पुढारी

Nawaz Sharif | चार वर्षांनंतर नवाझ शरीफ पाकिस्तानात परतले

पुढारी ऑनलाईन : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे सर्वेसर्वा नवाझ शरीफ तब्बल चार वर्षांनंतर इस्लामाबादला परतले आहेत. याबाबतचे वृत्त पाकिस्तानच्या समा टीव्हीने दिले आहे. नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे तीनवेळा पंतप्रधान राहिले आहेत. ते २०२४ च्या निवडणुकीपूर्वी राजकीय पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या 

७३ वर्षीय नवाझ शरीफ हे त्यांच्या काही कुटुंबातील सदस्य, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि मित्रांसह “उम्मीद-ए-पाकिस्तान” या चार्टर्ड फ्लाइटने दुबईहून इस्लामाबादमध्ये दाखल झाले. शरीफ यांचे विरोधक इम्रान खान सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. या पार्श्वभूमीवर नवाझ शरीफ यांची पाकिस्तानमध्ये एंट्री झाल्याने राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला निवडणुकीच्या आधी सध्या सुरक्षा, आर्थिक आणि राजकीय संकटांचा सामना करावा लागत आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे (Pakistan Muslim League-Nawaz) वरिष्ठ नेते ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी, “ही वेळ आशा आणि उत्सवाची आहे. नवाझ शरीफ यांचे स्वगृही येणे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि इथल्या लोकांसाठी चांगले आहे.”

नवाझ शरीफ यांची ग्रेटर इक्बाल पार्क येथे मिरवणूक निघणार आहे. या पार्श्वभूमीवर येथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी ७ हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, ऑगस्ट २०१७ मध्ये बेकायदा मालमत्ता बाळगल्याप्रकरणी शरीफ यांना दोषी ठरवले होते. पनामा पेपर्सप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने जुलै २०१७ मध्ये शरीफ यांना अपात्र ठरविले होते. जुलै २०१८ मध्ये शरीफ, त्यांची मुलगी मरियम आणि जावई निवृत्त कॅप्टन मोहम्मद सफदर यांना लंडनमधील चार लक्झरी फ्लॅट्सची खरेदीशी संबंधित खटल्यात अनुक्रमे ११ वर्षे, आठ वर्षे आणि एक वर्ष शिक्षा ठोठावली होती. पण, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने या तिघांना जामीन मंजूर केला होता.

या आठवड्याच्या सुरुवातीला इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शरीफ यांना मंगळवारपर्यंत संरक्षणात्मक जामीन मंजूर केला होता आणि ते देशात परत आल्यावर त्यांना त्वरित अटक केली जाणार नसल्याचे म्हटले होते.

शरीफ यांनी १९७६ मध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षात प्रवेश करून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. नवाझ शरीफ यांनी काही दिवसातच आपली एक ओळख निर्माण केली. १९८१ मध्ये ते पंजाबचे अर्थमंत्री बनले. १९८५ मध्ये शरीफ पहिल्यांदा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. पण, त्यानंतर त्यांचे पीएमएल सोबतचे त्यांच्या संबंध बिघडले. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) ची स्थापन केली.

१९९० मध्ये नवाझ शरीफ यांची पहिल्यांदाच पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाली. पण तत्कालीन राष्ट्रपती गुलाम इशाक खान यांच्याशी त्याचे पटले नाही. परिणामी राष्ट्रपतींनी शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली बडतर्फ केले. पण, काही महिन्यांनंतर मे १९९३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना पंतप्रधानपदी बहाल केले होते. त्यानंतर ते दोनदा पंतप्रधान झाले.

हे ही वाचा :

Back to top button