

अमृतसर ; वृत्तसंस्था : शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे भाऊ आहेत. सन 2018 मधील निवडणुकीत पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या पक्षाने शाहबाज यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले होते, पण या निवडणुकीत इम्रान यांचा पक्ष जिंकला. पंतप्रधान निवडीत शाहबाज यांना 96, तर इम्रान यांना 176 मते मिळाली होती. शाहबाज यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. याआधी तीनवेळा शाहबाज पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. शाहबाज शरीफ यांचे भारताशी खास असे 'कनेक्शन' आहे.
पाकिस्तानचे लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांचीही मुळे भारतातील दिल्लीत होती. माजी पंतप्रधान नवाझ यांच्याप्रमाणे अर्थातच शाहबाज यांचीही मुळे भारतात आहेत. ते पाकचे पंतप्रधान व्हावेत म्हणून भारताच्या पंजाबातील अमृतसर जिल्ह्यातील त्यांच्या या गावात प्रार्थनाही यातूनच झाल्यात. सीमेला लागूनच असलेल्या या गावाचे नाव जट्टी उमरा असे आहे. स्वातंत्र्यानंतर शरीफ कुटुंब पाकिस्तानात गेले होते. जट्टी उमरा गावात हिंदू बहुसंख्य आहेत. शरीफ कुटुंब अजूनही या गावाशी संबंध ठेऊन असल्याचे सांगण्यात येते.
शहबाज यांची आई पुलवामाची
नवाझ व शाहबाज यांचे वडील व आईही पैतृकद़ृष्ट्या मूळचे जम्मू-काश्मीरमधील रहिवासी आहेत. वडील मियाँ मोहम्मद हे अनंतनागचे तर आई पुलवामाची. पुढे मिया मोहम्मद हे अमृतसर जिल्ह्यातील जट्टी उमरा गावात स्थायिक झाले आणि फाळणीनंतर त्यांनी लाहोरमध्ये व्यवसाय सुरू केला आणि ते कायमचे तेथलेच झाले.
जट्टी उमराला येतात अधूनमधून
1964 मध्ये पहिल्यांदा शाहबाज वडील मियाँ मोहम्मद यांच्यासह जट्टी उमरा गावात आले होते. मियाँ मोहम्मद नंतर पुन्हा 1979 मध्ये आले होते. शाहबाज यांनी 15 डिसेंबर 2013 रोजी जट्टी उमरा गावाला भेट दिली.
शरीफ कुटुंबाची संपत्ती
'पाकिस्तान नॅशनल अकाऊंटेबिलिटी ब्युरो'नुसार शरीफ कुटुंबाची संपत्ती गेल्या 30 वर्षांत 20 लाख रुपयांवरून 700 कोटींवर गेली आहे.
…तर मरियम नवाझ असत्या पाक पंतप्रधान
तीनवेळचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पदावरून बरखास्त केले होते. नवाझ यांच्याप्रमाणेच त्यांची कन्या मरियम याही तूर्त 'डागी' आहेत. मरियम यांना एवेनफिल्ड भ्रष्टाचारात दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे नवाझ यांच्यासमोर पक्षाच्या नेतेपदी भाऊ शाहबाज यांच्या निवडीशिवाय पर्याय नव्हता.